सकाळच्या गुलाबी थंडीसोबतच दुपारचे कडक ऊनही निवळू लागले आहे. बुधवारी किमान तापमान १७ अंश से. पर्यंत खाली गेल्यानंतर गुरुवारी कमाल तापमानानेही डुबकी मारली. दुपारच्या वेळेसही तापमापकातील पारा कुलाबा येथे २९ अंश सें. व सांताक्रूझ येथे ३१.५ अंश सें.च्या पलीकडे गेला नाही.
नेहमीपेक्षा या वर्षी थंडीने उशिरा प्रवेश केला. मात्र आता थंडी हळूहळू पसरू लागली आहे. गेले काही दिवस किमान तापमानात सातत्याने घट झाली होती. बुधवारी सांताक्रूझ येथे १७ अंश सें. तापमान होते, त्यात गुरुवारी किंचित वाढ झाली. त्याच वेळी कमाल तापमान मात्र घटले. डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ात ३६.५ अंश सें.पर्यंत पोहोचलेले कमाल तापमान गुरुवारी २९ अंशांपर्यंतच पोहोचले.
कोरडे व तुलनेने थंड वारे येत असल्याने दुपारचे तापमान फारसे चढत नाही. पुढील दिवसांमध्येही ही स्थिती कायम राहणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना गुलाबी थंडी अनुभवता येणार आहे.