मुंबईतील विक्रोळी भागात एका नराधमाने विवाहित महिलेवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. शनिवारी रात्री या विवाहितेवर नराधमाने बलात्कार केला आणि त्यानंतर तिच्यावर धारदार शस्त्राने हल्लाही केला. या सगळ्या प्रकारानंतर नराधमाला अटक करण्यात आली आहे. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

पीडित तरूणी आणि बलात्कार करणारा तरूण एकाच ठिकाणी काम करत होते. हा तरूण या विवाहित तरूणीला आधी घडलेल्या एका घटनेवरून ब्लॅकमेल करत होता अशीही माहिती समोर आली आहे. तसेच तो तिला धमक्याही देत होता.

शनिवारी रात्री हा तरूण पीडित तरूणी काम करत असलेल्या ठिकाणी गेला. तिथे तिच्याशी बोलणे सुरू केले, त्यानंतर दोघांचा वाद झाला. ज्यानंतर या तरूणाने विवाहित तरूणीवर या नराधमाने बलात्कार केला आणि तिच्यावर हल्ला चढवला. या घटनेनंतर या महिलेने पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी या नराधमाला अटक केली असून त्याची अधिक चौकशी सुरू आहे.