मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागात कार्यरत असलेली महिला पोलीस शिपाई रुपाली उर्फ सुमेधा राजेश चव्हाण (२८) हिने गळफास लावून आत्महत्या केली. कौटुंबिक वादातून तिने आत्महत्या केली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे.
घाटकोपर (पश्चिम) वाहतूक विभागात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत असलेली रुपाली कन्नमवार नगर, विक्रोळी पूर्व येथील इमारत क्र. ७७ मध्ये पती आणि अडीच वर्षांच्या मुलासह राहत होती. शुक्रवारी तिची साप्ताहिक सुटी होती. दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास तिचा पती राजेश हा घरी आला, तेव्हा दार बंद होते. बराच वेळ दार ठोठावूनही काही प्रतिसाद न मिळाल्याने त्याने दार तोडून आत प्रवेश केला, तेव्हा रुपाली पंख्याला ओढणी बांधून गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आली. ‘मी आत्महत्या करत आहे. माझ्या आत्महत्येसाठी कुणालाही दोषी ठरवू नये’, असे लिहिलेली चिठ्ठी रुपालीच्या मृतदेहाजवळ आढळली. रुपालीने तिच्या मुलाला शेजाऱ्यांकडे ठेवून नंतर गळफास लावून घेतला.
विक्रोळी पोलिसांनी रुपालीचा मृतदेह राजावाडी रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. २३ मार्च रोजी रुपालीच्या तक्रारी वरून पतीविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल झाला होता, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक इंदलकर यांनी दिली.