ठाणे येथील विजयनगरी परिसरात मंगळवारी पहाटे तीन ट्रकच्या विचित्र अपघातात रिक्षा चिरडल्यामुळे रिक्षातील प्रवासी महिलेचा जागीच मृत्यू झाला तर तिचा पती आणि रिक्षाचालक गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी ट्रक चालक सुरेशकुमार राम आधार (२३) यास कासारवडवली पोलिसांनी अटक केली असून उर्वरित दोन ट्रकचे चालक पसार झाले आहेत. त्या पैकी एकाची ओळख पटली असून त्याचे नाव सुभेदार आफत सरोज असे आहे.
 ठाणे येथील पाचपखाडी भागात राहणारे ब्रायन डिसुझा आणि त्यांची पत्नी प्रतिक्षा हे दाम्पत्य मंगळवारी पहाटे योगेंद्र प्रताप सिंग (३९) यांच्या रिक्षातून बोरिवली येथून घरी परतत होते. दरम्यान, घोडबंदर येथील विजयनगरी परिसरातील रस्त्याच्या मधोमध सुरेशकुमार आधार याचा ट्रक बंद पडल्याने तो ट्रकच्या केबीनमध्ये झोपला होता. मात्र, बंद पडलेल्या ट्रकच्या मागे त्याने निशाण लावले नव्हते. त्यामुळे या रस्त्यावरून जाणाऱ्या दुसऱ्या ट्रकचालकास हा बंद ट्रक अचानकपणे दिसल्याने त्याने ट्रक वळविण्याचा प्रयत्न केला. या ट्रकच्या पाठीमागून योगेंद्र यांची रिक्षा होती. त्याचवेळी पाठीमागून येणाऱ्या तिसऱ्या ट्रकने त्यांच्या रिक्षाला जोरदार धडक देताच रिक्षा दोन्ही ट्रकच्या मधोमध चेंगरली गेली. यात प्रतिक्षा यांचा जागीच मृत्यू झाला.