घरात एकटय़ा असलेल्या महिलेची हत्या करून चोरी केल्याची घटना बोरीवलीत शुक्रवारी उघडकीस आली. सीमा पाताडे (४५) असे या महिलेचे नाव आहे. बोरीवली पश्चिम येथे बाभई नाका परिसरात ‘कृष्णा क्लासिक’ इमारतीत सीमा पाताडे या पती आणि मुलीसह रहात होत्या. इमारतीच्या ११ व्या मजल्यावर त्यांची सदनिका आहे. शुक्रवारी दुपारी त्यांची मुलगी महाविद्यालयातून घरी आली तेव्हा बराच वेळ झाला तरी आतून प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी शेजाऱ्यांकडील दुसऱ्या चावीने दार उघडल्यावर शयनगृहात सीमा पाताडे यांचा मृतदेह आढळून आला. उशीने तोंड दाबून त्यांची हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र, कर्णभूषण, कपाटातील रोख रक्कम आणि दोन सोन्याचे ब्रेसलेट चोरले होते.