शाळकरी मुलीचे अपहरण करण्याचा एका महिलेचा प्रयत्न पालकांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला. कुर्ला रेल्वे फलाटावरच या महिलेला रंगेहाथ पकडण्यात आले. १२ वर्षीय शाळकरी मुलगी कुर्ला पश्चिमेच्या एका शाळेत शिकते.
गुरुवारी २० नोव्हेंबर रोजी शाळा सुटल्यावर घरी परतत असताना हमिदा नावाच्या एका महिलेने तिच्याशी ओळख वाढवली; पण त्या मुलीने प्रसंगावधान दाखवत त्या महिलेशी बोलणे टाळून घर गाठले.
घरी गेल्यावर तिने पालकांना हा प्रकार सांगितला. दुसऱ्या दिवशी पालकांनी स्वत: शाळेजवळ येऊन पाळत ठेवली. या महिलेने या मुलीला बोलण्याचे निमित्त करून कुर्ला रेल्वे फलाट क्रमांक १ वर आणले. त्या वेळी पालकांनी तिला रंगेहाथ पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.
कुर्ला रेल्वे पोलिसांनी हमिदाला अपहरणाच्या गुन्हय़ात अटक केली आहे. ती अ‍ॅण्टॉप हिल येथे राहणारी आहे.