ब्रिटिश नागरिक असल्याचे सांगून फसवणूक
फेसबुकवर ओळख झालेल्या मित्राने एका महिलेला लाखो रुपयांना गंडा घातला आहे. मीरा रोड येथे ही घटना उघडकीस आली असून फरार झालेल्या भामटय़ाचा काशिमीरा पोलीस शोध घेत आहेत.
मीरा रोड येथे राहणारी ५३ वर्षीय महिला गेल्या वर्षांपासून फेसबुकवर स्वत:ला ब्रिटिश नागरिक म्हणवणाऱ्या एका व्यक्तीच्या संपर्कात आली. फेसबुकवर एकमेकांशी संभाषण सुरू झाल्यानंतर दोघांनीही एकमेकांना स्वत:चे मोबाइल क्रमांकही दिले. एक दिवस या व्यक्तीने महिलेजवळ प्रेमाची कबुली दिली आणि भारतात येऊन तिच्या नातेवाईकांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. या व्यक्तीने आपण २८ ऑक्टोबरला भारतात येणार असून दिल्ली विमानतळावर भेटण्यास या महिलेला सांगितले. ही महिला त्यानुसार दिल्ली विमानतळावर हजर झाली. त्याच वेळी तिला दुसऱ्या एका महिलेचा फोन आला. आपण कस्टम अधिकारी असून महिलेला भेटायला आलेल्या व्यक्तीला त्याच्याकडे अनधिकृत प्रवासी धनादेश सापडल्याने ताब्यात घेण्यात आले आहे. त्याला त्याच्या देशात परत पाठावायचे नसेल तर कस्टम विभागात आपल्याला एक लाख ६० हजार रुपये भरावे लागतील, असे सांगण्यात आले. या महिलेने तातडीने मीरा रोडला परतल्यावर दिलेल्या खात्यात ही रक्कम भरली.
दुसऱ्या दिवशी पुन्हा या महिलेला फोन आला आणि तिचा मित्र तिच्या खात्यात सात कोटी रुपये भरु इच्छितो, मात्र त्यासाठी आवश्यक असलेला कर आािण हस्तांतर शुल्कापोटी सव्वा लाख रुपये खात्यात भरण्यास तिला सांगण्यात आले. ही महिला पुन्हा या जाळ्यात फसली आणि तिने सांगितलेली रक्कम दिलेल्या खात्यात भरली. मात्र फसविले गेल्याचे लक्षात येताच या महिलेने काशिमीरा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. या महिलेने पसे भरलेल्या खात्याचा शोध घेण्यात येत असून याप्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल कदम यांनी दिली.