मध्य रेल्वेवर प्रवास करणाऱ्या महिलांना सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी प्रायोगिक तत्त्वावर रेल्वे प्रशासनाने राबवलेल्या ‘पॅनिक बटण’ योजनेचा गेल्या आठवडय़ात दोन वेळा गरवापर झाल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे या पॅनिक बटणचा गरवापर होत असेल तर त्याचा पुनर्वचिार करण्याची भूमिका रेल्वेने घेतली आहे.

‘मरे’ने सध्या एका लोकलमध्ये असलेल्या महिलांच्या पाच डब्यात पॅनिक बटणची व्यवस्था सुरू केली आहे. त्यास मिळणाऱ्या प्रतिसादानंतर अन्य लोकलमध्ये ही सुविधा देण्याचा रेल्वेचा मानस आहे. महिलांना रेल्वे डब्यात जर असुरक्षित वाटत असल्यास किंवा आणीबाणीची परिस्थिती उद्भवल्यास त्या हे बटण दाबून तात्काळ मदत मिळवू शकतात. मात्र, मध्य रेल्वेवर गेल्याच आठवडय़ात सलग दोन दिवस वाशी आणि मानखुर्द रेल्वे स्थानकांनमध्ये लोकल आली असता महिलांच्या डब्यातून या पॅनिक बटणाचा वापर करण्यात आला. मात्र, महिला प्रवाशांना कोणताही धोका नसताना त्याचा गरवापर झाल्याचे समोर आले. या बटणचा वापर झाल्याने दोन्ही दिवस लोकल सुमारे १५ मिनिटे एकाच ठिकाणी उभी होती. मात्र, या घटनांची चौकशी केली असता त्यात काही तथ्य नसल्याचे स्पष्ट झाले. अशावेळी एखादी लोकल १५ मिनिटे एकाच ठिकाणी कोणत्याही ठोस कारणाशिवाय उभी राहिल्यास संपूर्ण वेळापत्रकावर त्याचा परिणाम होतो. ऐन गर्दीची वेळ असल्यास तर प्रवाशांचे प्रचंड हाल होतात. या परिस्थितीत पॅनिक बटणचा गरवापर होण्याचे प्रकार वारंवार झाल्यास या योजनेचा पुनर्वचिार करावा लागेल, असे मत रेल्वे अधिकाऱ्यांकडून व्यक्त केले जात आहे.