माटुंगा रेल्वे स्थानकातील सर्व कामाकरिता महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून मध्य रेल्वेने प्रत्यक्ष कृतीमधून महिला सक्षमीकरणाचा नवा पायंडा घातला आहे. या स्थानकावर प्रवाशांना तिकीट देण्यापासून ते प्रवाशांची सुरक्षा वाहण्यापर्यंतचे प्रत्येक काम गेले २० दिवस महिला यशस्वीपणे पार पाडत आहेत.

मध्य रेल्वेच्या माटुंगा स्थानकात चार फलाट आहेत. दररोज ३० ते ३५ हजार प्रवासी या मार्गावर प्रवास करतात. या स्थानकातील सर्व कामकाज ३० महिला अधिकारी-कर्मचारी पाहत आहेत. यात महिला स्टेशन मास्तरसह ११ तिकीट आरक्षण कर्मचारी, ७ तिकीट तपासनीस, २ मुख्य बुकिंग पर्यवेक्षक, २ उद्घोषणा करणाऱ्या महिला कर्मचारी आणि अन्य कामांसाठी ५ ‘पॉइंट्समन’ यांचा समावेश आहे. तर प्रवाशी व महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी ५ महिला अधिकारी-कर्मचारी रेल्वे सुरक्षा बलाच्या वतीने तैनात करण्यात आल्या आहेत.

३० जून रोजी मध्य रेल्वेवरील माटुंगा स्थानकाची स्टेशन मास्तर म्हणून ममता कुलकर्णी यांनी जबाबदारी स्वीकारली. ‘तेव्हापासून आपल्याला इतर महिला सहकाऱ्यांचे सहकार्य मिळते आहे. आम्ही सर्व महिला कर्मचारी असल्यामुळे एकमेकांच्या समस्या, प्रश्न एकमेकांकडे विनासंकोच व्यक्त करतो,’ असे कुलकर्णी यांनी आपला अनुभव मांडताना सांगितले. आपला मुद्दा अधोरेखित करताना त्यांनी एक प्रसंग सांगितला. माटुंगा स्थानकात काम करत असलेल्या एका महिला तिकीट आरक्षण कर्मचाऱ्याला रात्रपाळीच्या वेळी फिट आली होती. ही गोष्ट मुख्य आरक्षण क्लर्क असलेल्या संगीता नयना यांना कळताच पहाटे चार वाजता येऊन त्यांनी कामाची जबाबदारी स्वीकारली. कुलकर्णी यांच्या मताला पुस्ती देत मुख्य तिकीट पर्यवेक्षक श्रीकला मेनन म्हणाल्या, महिलांना दुसऱ्या महिलेचे प्रश्न, त्रास, अडचणी समजू शकतात.

या प्रयोगाबद्दल घरातील सदस्य, नातेवाईक व अनेक ओळखीच्या व्यक्तीकडून आमचे कौतुक केले जात आहे.’ इतर महिला कर्मचाऱ्यांचीही अशीच भावना आहे.

पूर्वी आम्ही लोकलमध्ये तिकीट तपासत होतो. त्यानंतर स्थानकाची जबाबदारी देण्यात आली.

माटुंगा परिसरात जास्त महाविद्यालये असल्यामुळे येथे प्रवासी विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे फारसा त्रास जाणवत नाही. उलट प्रवासी स्वत: येऊन आमचे अभिनंदन करतात, तेव्हा कामाचा हुरूप आणखीच वाढत असल्याचे मुख्य तिकीट तपासनीस अस्मिता मांजरेकर यांनी सांगितले.

तर ‘मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी.के. शर्मा यांनी आमच्यावर विश्वास दाखवून अख्खे स्थानक आमच्या ताब्यात दिले.

त्यांचा विश्वास आम्ही निश्चतपणे सार्थ ठरवू,’ असा विश्वास स्थानकाच्या मुख्य तिकीट पर्यवेक्षक नीता रमेश मोटाबाई यांनी व्यक्त केला.

शौचालयाचा अभाव

माटुंगा स्थानकात शौचालयाची सुविधा कार्यालयाबाहेर आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी महिला कर्मचाऱ्यांना तिकीट आरक्षण केंद्र सोडून बाहेर जाता येत नाही. त्यामुळे कर्मचारी महिलांकरिता कार्यालयाबाहेर शौचालयाची व्यवस्था होणे आवश्यक आहे.

घर सांभाळतो तसेच आम्ही स्टेशनही संभाळतो. पूर्वी आम्ही दिवसा काम करत असू. मात्र आता रात्रपाळीतही काम करावे लागते. याला आमच्या घरच्यांनीही पाठिंबा दिल्यामुळे कोणतीही अडचण जाणवत नाही.

संगीता नयना, मुख्य तिकीट आरक्षण कर्मचारी