25 May 2016

साहित्यविश्वात ‘अजब’ खळबळ

अजब पब्लिकेशन-डिस्ट्रिब्युटर्सने सुरू केलेल्या ‘पन्नास रुपयांत घ्या कोणतेही पुस्तक’ या योजनेने मराठी प्रकाशक, ग्रंथविक्रेते

शेखर जोशी, मुंबई | January 21, 2013 2:33 AM

अजब पब्लिकेशन-डिस्ट्रिब्युटर्सने सुरू केलेल्या ‘पन्नास रुपयांत घ्या कोणतेही पुस्तक’ या योजनेने मराठी प्रकाशक, ग्रंथविक्रेते आणि एकूणच साहित्य विश्वात खळबळ उडाली आहे. दादर, ठाणे, पनवेल येथे पुस्तक खरेदीसाठी गेल्या दोन-चार दिवसांपासून लागत असलेल्या रांगांमुळे मराठी वाचन संस्कृती लोप पावत चालल्याचा समज खोटा ठरला आहे.
अन्य काही प्रकाशकांनी मात्र या बाबत ‘थांबा आणि वाट पाहा’ असे सांगून, मराठी पुस्तके खरेदी करण्यासाठी प्रचंड गर्दी होत आहे, ही स्वागतार्ह बाब असली तरी दोन दिवसांच्या गर्दीवरून कोणताही निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही, अशी भूमिका घेतली.
ज्या लेखकांच्या साहित्यावरील कॉपीराइट कायदा संपुष्टात आला आहे, अशा काही लेखकांची पुस्तके या योजनेत आहेत. यात साने गुरुजी, स्वातंत्र्यवीर सावरकर, नाथमाधव, वि. वा. हडप आदी लेखकांचा समावेश असून, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे ‘माझी जन्मठेप’, साने गुरुजी यांचे ‘श्यामची आई’ ही दोन पुस्तके प्रचंड प्रमाणात विकली जात आहेत. ‘गांधी हत्या आणि मी’, ‘स्मृतिचित्रे’या पुस्तकांनाही मोठी मागणी आहे, अशी माहिती अजब पब्लिकेशन-डिस्ट्रिब्युटर्सचे शीतल मेहता यांनी दिली.
स्वस्ताईचे गौडबंगाल काय? अन्य प्रकाशक किंवा ग्रंथविक्रेत्यांकडून वाचकांना दहा ते वीस टक्के सवलत देऊनही जी पुस्तके दोनशे ते तीनशे किंवा त्याहूनही अधिक किमतीत विकत घ्यावी लागतात, तर या योजनेत अवघ्या पन्नास रुपयांमध्ये कसे काय मिळू शकते, त्यात ग्रंथविक्रेते आणि ज्यांनी ही योजना राबविली त्यांना फायदा काय, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. एका प्रकाशक आणि विक्रेत्याने या योजनेमागील व्यावसायिक गणित उलगडून दाखविले. त्यांनी सांगितले की, १५ ते २० हजार या संख्येत पुस्तकाच्या प्रती छापून घेतल्याने डीटीपी, पुस्तक बांधणी, कागद आदींबाबतचा सर्व खर्च एकदम कमी झाला आहे. तसेच लेखक किंवा त्यांच्या वारसांकडून संबंधितांनी पुस्तकांचे हक्क विकत घेतले आहेत. तसेच त्या लेखकांना ‘रॉयल्टी’ देऊन टाकल्याने व प्रकाशकही तेच स्वत: असल्याने विक्रीतून होणारा फायदा त्यांचाच आहे.
‘ते आमचे गुपित!’
ज्या ग्रंथविक्रेत्यांच्या मदतीने पुस्तक प्रदर्शन भरविण्यात आले आहे, त्यांनाही विकल्या गेलेल्या प्रत्येक पुस्तकामागे एक ठराविक रक्कम दिली जात आहे. त्यामुळे ‘पन्नास रुपयात पुस्तक’ योजनेचा फायदा वाचकांबरोबरच ज्यांची योजना आहे त्यांना आणि संबंधित ग्रंथविक्रेत्यांनाही होत आहे, अशी माहिती अजब पब्लिकेशन-डिस्ट्रिब्युटर्सचे शीतल मेहता यांनी दिली. मात्र या योजनेचे गणित आणि नफ्याविषयी विचारले असता त्यांनी, ते आमचे ‘व्यावसायिक गणित व गुपित’ असल्याचे सांगून या विषयी अधिक माहिती देण्यास असमर्थता व्यक्त केली.

First Published on January 21, 2013 2:33 am

Web Title: wonderful excitement in literature world