जैतापूर अणुउर्जा प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध कायम असून कोणत्याही परिस्थितीत जैतापूरचा फुकूशिमा होऊ देणार नाही, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथे केले. शिवसेनेचे शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.
वांद्रे येथील पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या तृप्ती सावंत विजयी झाल्यानिमित्ताने शिवसेनेने आयोजित केलेल्या विजय मेळाव्यानंतर मंगळवारी रात्री पत्रकारांशी बोलताना ठाकरे यांनी जैतापूर प्रकल्पाबाबत आपली भूमिका मांडली. जैतापूर प्रकल्प प्रतिष्ठेचा बनवू नका. हा प्रकल्प म्हणजे एक राक्षस आहे. हा प्रकल्प आता मागे घेणे शक्य नाही, असे मुख्यमंत्री म्हणत असले तरी त्यावर चर्चा होऊ शकते, असे मत ठाकरे यांनी व्यक्त केले. जर्मनीत जर अणुउर्जा प्रकल्प बंद होऊ शकतात, तर भारतात का होऊ शकत नाही, असा सवाल ठाकरे यांनी केला. मुंबईचा प्रारुप विकास आराखडा विचित्र होता. त्याविरोधात शिवसेनेने प्रथम आवाज उठविला होता, असे सांगून तो रद्द केल्याबद्दल ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.