मुंबईसह अवघ्या देशाला नवरात्रोत्सवाचे वेध लागले असताना पश्चिम बंगालमध्ये दुर्गाउत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. बंगाली संस्कृतीत नवरात्रात ‘दुर्गा पूजे’ची विशेष परंपरा आहे. नवरात्राच्या सातव्या दिवसापासून ते विजयादशमीपर्यंत दुर्गादेवीची आराधना बंगाली संस्कृतीत केली जाते. आजही मुंबईत स्थायिक झालेला बंगाली समाज हा दुर्गा पूजेचा उत्सव आनंदाने आणि आपली संस्कृती जोपासत साजरा करतो आहे.

बंगाली समाजात देवी दुग्रेला विशेष महत्त्व असून तिला ‘दुर्गा माँ’ असे संबोधले जाते. नवरात्रीच्या दिवसात दुर्गा पूजा करण्याची बंगाली समाजाची विशेष परंपरा आहे. साधारण महाराष्ट्रात नवरात्रीच्या पहिल्या म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी घटाची स्थापना करून मग नऊ दिवसाच्या नऊ माळा पूर्ण करत देवीची आराधना केली जाते. पण बंगाली समाजात नवरात्रीच्या सातव्या दिवशी दुर्गा माँची भव्य प्रतिमा स्थापित करून विजयादशमीपर्यंत तिची पूजा-अर्चा करण्याची पद्धत आहे.

या पूजेत दुर्गा माँच्या प्रतिमेला विशेष महत्त्व असते. अगदी पारंपरिक पद्धतीनेच तिची भव्य प्रतिमा मूíतकारांकडून घडवून घेतल्या जातात. यात देवीच्या मूर्तीबरोबरच गणपती, काíतकेय, सरस्वती आणि लक्ष्मी यांच्या मूर्तीचाही समावेश असतो. यात एका भल्या मोठय़ा आडव्या पाटावर या मूर्तीची मांडणी केली जाते आणि त्याच्यामागे एक भव्य कमान उभी केली जाते. मुंबईत दुर्गा मूर्तीच्या वाढत्या मागणीमुळे अनके कारागीर कोलकातावरून या काळात मुंबईत वास्तव्यास येतात आणि या प्रतिमा पारंपरिकरीत्या बनवण्यासाठी खोर, लाकूड, बांबू, सुतळ, गंगा नदीच्या खोऱ्यातली चिकण माती आणि वाळू ही सामुग्री ते कोलकाताहून आपल्यासोबत घेऊन येतात. तसेच देवीला सजवण्यासाठी लागणारी साडी, तिचे केस आणि आभूषणेही आम्ही कोलकाताहून मागवतो, असे मूíतकार अमित पाल सांगतात.

अमित पाल हे दरवर्षी दुर्गादेवीच्या प्रतिमा घडवण्यासाठी आपल्या दहा-पंधरा कामगारांसह मुंबईत येतात. या वर्षीच्या उत्तर उपनगरातील प्रसिद्ध असलेल्या ‘सारभोजनी दुर्गा पूजा समिती’च्या १७ फूट उंचीची आणि ५० टन वजनाची दुर्गादेवीची प्रतिमा अमित साकारत आहेत. यंदा ही प्रतिमा क्रेनच्या साहाय्याने मंडपात नेण्याचा समितीचा विचार आहे.

सहाव्या म्हणजे महासष्टीच्या दिवशी सायंकाळी शंखांचा नाद करत दुर्गादेवीची प्रतिमा मंडपात आणली जाते. याला आमंत्रण अथवा अधिवास असे म्हटले जाते. महासप्तमी म्हणजेच सातव्या दिवशी त्या प्रतिमेची प्राणप्रतिष्ठापना केली जाते. सर्वप्रथम कलश स्थापनेचा विधी केला जातो. यात एका कलशामध्ये श्रीफळ आणि आंब्यांची पाने लावून दुर्गा माँचे प्रतीक मानून त्याची पूजा केली जाते. त्यानंतर महास्थानाचा विधी पार पाडला जातो. यात प्रतिमेसमोर एक आरसा ठेवून त्या आरशात पडणाऱ्या देवीच्या प्रतििबबावर हळद आणि मोहरीचे तेल लावून त्या प्रतििबबाला उसाच्या रसाने अथवा गंगेच्या पाण्याने स्नान घातले जाते. त्यानंतर पुजारी दुर्गा माँचे नाव लिहिलेला आरसा, साडी, आभूषणे हे सगळे बेडी म्हणजे पूजा करण्याच्या ठिकाणी ठेवून त्याची पूजा करतात. या सर्व प्रक्रियेत सर्व जातीच्या आणि देहविक्री करणाऱ्या स्त्रीच्या घरातील मातीला विशेष महत्त्व असते. या सर्व विधींनंतर प्राणप्रतिष्ठापना हा महत्त्वाचा विधी पूर्ण केला जातो. यात पुजारी मंत्रोच्चार करून कलश आणि दुर्गादेवीच्या प्रतिमेत प्राण निर्माण करतो, अशी आख्यायिका आहे.

अष्टमीच्या दिवशी देवींनी महागौरीचे रूप घेतल्यामुळे तिची महागौरी पूजा केली जाते. यानंतर नवमीला चंडी पूजा केली जाते. या क्षणी देवीने चामुंडाचे रूप घेतलेले असते. त्यावेळी देवीला विशेष असा ‘नीट भोग’ चढवला जातो. यात भात, वरण, भाजी, चटणी आणि पायेश या गोड पदार्थाचा समावेश असतो. १०८ दिवे आणि १०८ कमळ फुलेही याक्षणी देवीला वाहिली जातात.

विजयादशमीच्या दिवशी देवीला मध-दुधाचा भोग दाखविला जातो. याला ‘चरणमिर्ती’ असे म्हणतात. याच दिवशी स्त्रिया सिंदुर उत्सव साजरा करतात. देवी आपल्या पतीच्या घरी कैलासावर जात आहे, अशी धारणा धरून त्या तिच्या डोक्यावर सिंदूर लावतात. याला ‘कनक अंजली’ असे म्हटले जाते. त्यानंतर देवीच्या उत्तरपूजेची सुरुवात होते. यामध्ये कलशासमोर उत्तर दिशेस म्हणजेच कैलास पर्वताच्या दिशेने एक फूल ठेवले जाते आणि त्यानंतर देवीच्या प्रतिमेस विसर्जनासाठी बाहेर काढले जाते. विसर्जनानंतर पुजारी विसर्जनस्थळावरील पाणी ज्याला शांती जल म्हटले जाते ते भक्तांच्या अंगावर आंब्याच्या पानाच्या साहाय्याने िशपडतो.

मुंबईत स्थायिक झालेला बंगाली समाज कित्येक वष्रे दुर्गा पूजेचा उत्सव साजरा करत आला आहे. उत्तर मुंबईतील ‘सरबोजानी दुर्गा पूजा समिती’ आपल्या दुर्गा पूजेसाठी प्रसिद्ध आहे. समितीचे दुर्गा पूजा साजरा करण्याचे हे ६९वे वर्ष असून अनेक बंगाली सिनेकलाकारांची या पूजेत वर्दळ असते. तसेच सर्वात उंच दुर्गा देवीची प्रतिमा असणारे हे एकमेव मंडळ आहे. यावर्षी १७ फूट उंचीची आणि ५० टन वजनाची मूर्ती समितीने साकारली आहे. या समितीच्या पूजेला ‘घरू पूजा’ म्हणजेच घरची पूजा असे म्हटले जाते. कारण चाळीसच्या दशकातले प्रसिद्ध निर्माते सशाधर मुखर्जी यांनी ही दुर्गा पूजा सुरु केली होती. त्यानंतर आता त्याचे स्वरूप सार्वजनिक झाले असले तरी आजही मुखर्जी घराण्यातील डेबू मुखर्जी, अभिनेत्री राणी मुखर्जी आणि काजोल या ठिकाणी हजेरी लावतात. या शिवाय मध्य मुंबईतील शिवाजी पार्कमधील ‘बंगाल क्लब’ही नित्यनेमाने दुर्गा पूजा साजरी करत आले आहे. यंदा या मंडळाचे ८१वे वर्ष आहे. या शिवाय अनेक बंगाली समाजबहुल भागात सार्वजनिक दुर्गा पूजेचे आयोजन केले जाते.