पुलासह सरकत्या जिन्याचे आज उद्घाटन

धनत्रयोदशीच्या शुभमुहूर्तावर आपल्या प्रवाशांचा प्रवास सुखकर व आरामदायी व्हावा, अशा केवळ शुभेच्छा न देता पश्चिम रेल्वेने प्रवाशांना खरोखरची भेट देण्याची सोय केली आहे. ऐन दिवाळीत पश्चिम रेल्वेतर्फे बोरिवली स्थानकातील फलाट क्रमांक चार व पाच मधील सरकत्या जिन्याचे आणि फलाट क्रमांक सात व सहा ए या पूर्व-पश्चिम दिशेला जोडणाऱ्या पादचारी पुलाचे उद्घाटन सोमवारी (९ नोव्हेंबर) रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत लाखो प्रवाशांचा प्रवास आरामदायी होईल, असा दावा पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.
उपनगरीय स्थानकांमध्ये सर्वाधिक वर्दळीच्या स्थानकांच्या यादीत वरच्या क्रमांकांवर असलेल्या बोरिवली स्थानकातून दरदिवशी सुमारे तीन ते चार लाख प्रवासी प्रवास करतात. मात्र गेले अनेक वर्षे प्रवाशांचा इतका मोठा टक्का असूनही या स्थानकात अपुऱ्या सोयीसुविधा असल्याची ओरड होत होती. या पाश्र्वभूमीवर मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन आणि पश्चिम रेल्वे यांनी एकत्रित येऊन पादचारी पूल आणि सरकत्या जिन्याचे काम हाती घेतले होते.
त्यानुसार अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर या पादचारी आणि सरकत्या जिन्याचे काम पूर्ण झाले आहे. या जिन्याचा वेग ०.५ मीटर प्रतिसेकंद एवढा असणार असून या जिन्यावरून एका तासाला नऊ हजार प्रवासी प्रवास करू शकणार असल्याचे पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्याने सांगितले.