लेखन आणि विचारसरणीचा काहीही संबंध नसतो. निदान चांगला लेखक तरी विचारसरणीच्या आहारी जात नाही, कारण सुधारणा करणे हे लेखकाचे काम नसते. किंबहुना तो अशा फालतू चर्चेतच पडत नाही, अशा शब्दांत ज्येष्ठ साहित्यिक आणि ‘ज्ञानपीठ’ पुरस्काराचे मानकरी भालचंद्र नेमाडे यांनी साहित्यनिर्मितीमागील महत्त्वाच्या समजालाच थेट उभा छेद देत परंपरेशी घट्ट नाते सांगणारा आपला साहित्यविषयक दृष्टिकोन विषद केला.
मुंबई विद्यापीठाच्या ‘राजीव गांधी समकालीन अध्ययन केंद्रा’तर्फे आयोजिण्यात आलेल्या ४थ्या व्याख्यानमालेत ते बोलत होते. ‘समकालीन साहित्य आणि समाज’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. त्यात विवेकवादी, इहवादी दृष्टिकोनांपासून ते शुद्धलेखनापर्यंतच्या अनेक समाजमान्य विचारांची चिरफाड करणारे भाष्य नेमाडे यांनी केले. त्यांचा पहिला आक्षेप हा ‘ज्ञानेश्वरी’ला मराठीतला पहिला अभिजात ग्रंथ समजण्यावर होता. ‘मराठीची अभिजात साहित्याची परंपरा दुसऱ्या शतकातील ‘गाथा सप्तशती’पासून सुरू होते. त्यानंतर धूर्त आख्यान, लीळाचरित्र अशा किती तरी ग्रंथांनी मराठीची शोभा वाढविली आहे. ज्ञानेश्वरीने त्यावर कळस चढविला. त्यामुळे पाठय़क्रमात मराठीची मुळे शोधण्याचा प्रयत्न हा दुसऱ्या शतकातील जैन-महाराष्ट्रीय भाषेतील गाथा सप्तशतीपासून व्हायला हवा,’ असे प्रतिपादन त्यांनी केले. संस्कृतमधून मराठीची निर्मिती झालेली नसून संस्कृतच इतर भाषांच्या आधारे समृद्ध झाल्याचा दावा त्यांनी केला.
साहित्यामुळे जितके आपले अवकाश रुंदावते तितके ते कशामुळेच होत नाही. परंतु, असे उत्तुंग आणि अभिजात साहित्य आपल्या संस्कृती आणि परंपरांमधूनच निर्माण होऊ शकते. त्यातही साहित्यात बहुसांस्कृतिकीत्व जपणं, मानणं असं आपल्याकडे होत नाही आणि असे साहित्य कुणी लिहिलं तरी दुर्दैवाने त्याला मानाचं स्थान मिळत नाही. कारण एका वसाहतवादी कायद्याच्या, राष्ट्रीयत्वाच्या पगडय़ाखाली गेली दीडशे-दोनशे वर्षे आपली साहित्य निर्मिती करीत आलो आहोत. आपली अशी आकलनशक्ती दुभंगलेली असल्याने उत्तुंग साहित्य निर्मिती या काळात झाली नाही,’ अशी परखड भूमिका नेमाडे यांनी मांडली. ‘कुठल्याही गोष्टीचे केंद्रीकरण करणे फार वाईट. कारण अशा स्थितीत वर्तुळावरील लोकांना महत्त्व दिले जात नाही. त्याची निष्पत्ती आपल्या भाषा, संस्कृती मरण्यात होते. केंद्रीकरणाबरोबरच सगळ्या क्षेत्रात घुसलेला ‘अभिजनवाद’ हा देखील बहुसांस्कृतिकतेला मारक ठरतो आहे,’ अशा शब्दांत नेमाडे राष्ट्रवादाच्या नावाखाली एकच एक संस्कृती, धर्म, भाषा यांचा आग्रह करण्याच्या भूमिकेवर कोरडे ओढले.
‘संथारा’ हा जगण्याचा सुंदर मार्ग
रुग्णालयात मरत मरत जगण्याऐवजी ‘संथारा’ने मरणे अधिक सुंदर आहे, असे आपल्या परंपरांची पाठराखण करताना नेमाडे यांनी सांगितले. ‘धर्मानंद कोसंबी संथारानेच वारले. मरण्याचा हा जगातला अत्यंत सुंदर मार्ग आहे. गळ्यात फास घेऊन मरण्याऐवजी आणि रुग्णालयात पडून राहून सर्व नातेवाईकांना त्रास देत देत मरण्यापेक्षा तरी निश्चितच चांगला मार्ग आहे,’ अशी पुस्ती त्यांनी जोडली.
..तर मराठी माणसाचा मेंदू हलका होईल
मराठीच्या व्याकरणातील क्लिष्टता काढली तर मराठी माणसाचा मेंदू किती तरी हलका होईल, असे सांगत त्यांनी मराठीत शुद्धलेखनासाठी केल्या जाणाऱ्या आग्रहावरच आपला टीकेचा आसूड ओढला. ऱ्हस्व-दीर्घ असे वेगवेगळे प्रकार ठेवण्याऐवजी ते एकच का असू नये, असा विचार त्यांनी मांडला. अर्थात हा आग्रह व्यवहार्य तर नाहीच; पण मराठीच्या श्रीमंतीवरच कसा घाला घालणारा ठरेल, हे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनीच आभारप्रदर्शनाच्या आपल्या छोटेखानी भाषणात लक्षात आणून दिले. मराठीत ‘दीन’ (दुबळा) किंवा ‘दिन’ (दिवस) या दोन शब्दांचा अर्थ वेगवेगळा असतो. हे दोन्ही शब्द ऱ्हस्व किंवा दीर्घ लिहायचे ठरेल तर गोंधळ उडेल, असे देशमुख यांनी दाखवून दिले.
नेमाडे उवाच
* इंग्रजीत मराठीइतके अभिजात साहित्य बनले नाही.
* नेहमी केवळ समकालीन विचार केल्याने समस्या निर्माण होतात.
* आपल्या साहित्याला वसाहतवादानंतर वाईट दिवस आले.
* सामाजिकीकरणाची पद्धत म्हणून साहित्याकडे पाहिले पाहिजे.
* समाजाची घडी सुरळीत बसविण्यावर कायदे, पोलीस, फाशीची शिक्षा हे उत्तर नाही.