महाराष्ट्रातील उद्योगांच्या विकासासाठी अर्थकारणाशी संबंधित अनेक संस्था स्थापन करण्यात महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी पुढाकार घेतला. मात्र, या संस्थांच्या कामात त्यांनी कधीही राजकारण आणले नाही. यशवंतरावांच्या या समंजस दृष्टिकोनामुळेच महाराष्ट्र उद्योगक्षेत्रात आघाडी घेऊ शकला, अशा शब्दांत माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यशवंतरावांच्या दूरदृष्टीचा गौरव केला.
यशवंतरावांच्या १०२व्या जयंतीच्या निमित्ताने ‘यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान’च्या वतीने दिला जाणारा ‘यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार’ टाटा उद्योग समूहाच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचलणारे प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांना देण्यात आला. परदेशात असल्याने रतन टाटा पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांच्या वतीने हा पुरस्कार ‘टाटा कॅपिटल लिमिटेड’चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण कडले यांनी स्वीकारला.
समारंभाच्या अध्यक्षीय भाषणात पवार यांनी टाटांच्या ‘टेल्को’ या प्रतिष्ठित कंपनीत झालेल्या कामगारांच्या अनाठायी संपाच्या दिवसांची आठवण सांगितली. पवार त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासात महत्त्वाचा वाटा असलेल्या या कंपनीला संपामुळे टाळे लागण्याची वेळ आली होती. मात्र, ‘या प्रकारचे मोठे उद्योगसमूह आपल्या शब्दाखातर राज्यात उभे राहिले आहेत. त्यांना जप,’ हे यशवंतरावांचे शब्द माझ्या कानात घुमत होते. त्यामुळे, पुण्यातल्या इतर खासगी कंपन्यांच्या तुलनेत कामगारांना सर्वाधिक वेतन देणाऱ्या ‘टेल्को’चा केवळ कामगार नेत्याच्या दुराग्रहापोटी सुरू असलेला संप संपविण्यात आपण पुढाकार घेतला,’ असे सांगत महाराष्ट्रातील उद्योग संपविण्याचा ‘उद्योग’ त्यावेळी काही मंडळी कशी करत होती याचे उदाहरण पवार यांनी दिले.
आपल्यापेक्षाही व्यवस्थेला मोठे मानण्याचा मोठेपणा रतन टाटा यांच्याकडे होता. म्हणूनच शिवाजी महाराजांचे ‘उपभोगशून्य’ म्हणून जे वर्णन केले जाते, ते टाटा यांना चपखलपणे लागू होते, असे प्रतिपादन ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी केले.  ‘टाटायन’ या पुस्तकाच्या निमित्ताने टाटांना भेटण्याची संधी मिळाली. ते सहजपणे भेटतात. तसेच, तृतीयपानी वर्तुळात वावरण्याचा किंवा दुसऱ्यांचे डोळे दीपवणारी संपत्ती जमवण्याचा सोस टाटांना नाही. उद्योगांच्या उभारणीकडे समाजाची गरज म्हणून पाहण्याची दृष्टी त्यांच्याकडे असल्यानेच संपत्तीची निर्मिती आणि मालकी यातील वेगळेपणा त्यांनी जपला’ अशा शब्दांत कुबेर यांनी टाटांचे मोठेपण अधोरेखित केले.
आपण वाढविलेल्या व्यवस्थेपासून स्वत:ला असे वेगळे करणे निश्चितच कठीण आहे. पण, ही तोडण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. त्यामुळेच, वयाच्या ७५ व्या वर्षी टाटा उद्योग समूहातून पायउतार झाल्यानंतर ते टाटाचे मुख्यालय असलेल्या ‘बॉम्बे हाऊस’ या कार्यालयाकडेही एकदाही फिरकले नाहीत, असे त्यांनी नमूद केले. टाटा यांना केवळ उद्योगपती म्हणून न पाहता त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूंचा विचार या पुरस्कारासाठी निवड करताना करण्यात आला, असे ज्येष्ठ संशोधक डॉ. अनिल काकोडकर यांनी यावेळी सांगितले. प्रतिष्ठानचे कार्यवाह शरद काळे यांनी टाटा यांना दिलेल्या मानपत्राचे वाचन केले. विविध उपक्रमांचा आढावा खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतला. सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार अंबरिश मिश्र यांनी केले.

पुस्तक मराठीत
राज्यशास्त्राचे अभ्यासक जयंत लेले यांनी १९६७ ते १९८१ या काळात घेतलेल्या यशवंतराव चव्हाण यांच्या मुलाखतींच्या इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. हे पुस्तक मराठीतूही अभ्यासकांना उपलब्ध व्हावे, यासाठी त्याचे मराठीतून भाषांतर करण्याचा उपक्रम प्रतिष्ठानच्या वतीने हाती घेण्याचा विचार यावेळी पवार यांनी बोलून दाखविला.

sanjay raut on yogi adityanath
योगी आदित्यनाथ यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून संजय राऊतांचे टीकास्र; म्हणाले, “योगींनी यूपीतच थांबावं, तिथे…”
Sanjay Raut
मराठी माणूस व एकीकरण समितीत फूट पाडण्याचे भाजपचे कारस्थान – संजय राऊत
Maharashtra
मुद्दा महाराष्ट्राचा… महाराष्ट्र समस्यांच्या विळख्यात का?
Paper leak Examination Malpractices Act Report submitted by Nimbalkar Committee
पेपरफुटी, परीक्षेतील गैरप्रकारांवर कायदा! निंबाळकर समितीकडून अहवाल सादर

महर्षी शिंदे यांच्या साहित्यावर संकेतस्थळ
न्याय, समता, माणुसकी या तत्त्वांवर आधारित महाराष्ट्राच्या सामाजिक जडणघडणीला हातभार लावणाऱ्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्यावरील संकेतस्थळाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. यात महर्षीचे विचार मांडणारे साहित्य माहितीच्या महाजालाच्या माध्यमातून अभ्यासकांकरिता उपलब्ध करून देण्यात आले आहे. शिंदे यांचे नातजावई असलेले गो. मा. पवार यांनी शिंदे यांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकणारे लिखाण या संकेतस्थळासाठी उपलब्ध करून दिले आहे. त्यांचाही यावेळी सपत्नीक सत्कार करण्यात आला.