पुण्यातील येरवडा कारागृहाचे अधीक्षक आणि कर्मचारी गुंड टोळ्यांकडून दरमहा ‘पगाराप्रमाणे हप्ता’ घेतात. मला पाच लाख रुपये दिले, तर या कारागृहातील सुरक्षा भेदून मला हवे ते मी करून दाखवेन, असा खळबळजनक आरोप आमदार अनिल गोटे यांनी विधानसभेत केला. या आरोपातील सत्यता तपासून गुन्हे अन्वेषण विभागाकडून चौकशी केली जाईल, असे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी स्पष्ट केले.
तुंरुगातील कैद्यांना मोबाइल आणि अन्य सुविधा कशा मिळतात, हा मुद्दा प्रश्नोत्तराच्या तासात माधुरी मिसाळ, पंकजा पालवे- मुंडे आदींनी उपस्थित केला होता. त्या वेळी बोलताना गोटे यांनी हा आरोप केला.
तेलगी मुद्रांक गैरव्यवहारात गोटेही तुरुंगात होते. ‘मी चार वर्षे तुरुंगात काढली असून तुरुंगांच्या भिंतीआड काय चालते, हे मला चांगले माहीत आहे. तुरुंग अधीक्षकांना गुंडांकडून दरमहा २५ हजार रुपयांचा हप्ता मिळतो,’ असा दावा त्यांनी केला. त्यावर आता तुरुंगामध्ये सीसीटीव्ही व मोबाईल जॅमर्स यंत्रणा बसविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती गृहमंत्र्यांनी दिली. प्रत्येक कर्मचाऱ्याची, कैद्यांची कारागृहात प्रवेश करताना झडती घेतली जाते. न्यायालयाच्या आदेशानुसार ज्या कैद्यांना घरचा डबा मिळतो, तो उघडून पाहिला जातो. तुरुंग नियमावली व्यतिरिक्त अतिरिक्त सोयी कैद्यांना दिल्या जात नाहीत. या नियमावलीत काही बदल केले जातील आणि सुरक्षा कर्मचारी वाढविले जातील, असेही गृहमंत्र्यांनी सांगितले.