भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्यापासून दूर गेलेले त्यांचे पुतणे धनंजय मुंडे यांना विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादीने सारी शक्ती पणाला लावली आहे. पुतण्याचा विजय सहज होऊ नये म्हणून काका प्रयत्नशील असतानाच दुसरीकडे राष्ट्रवादीने युतीच्या काही मतांवर डोळा ठेवून मुंडे यांनाच राजकीय धक्का देण्याची व्यूहरचना आखली आहे.
विधान परिषदेच्या एका जागेसाठी सोमवारी होणाऱ्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे व अपक्ष पृथ्वीराज काकडे यांच्यात लढत होणार आहे. कागदावरील अंकगणितानुसार काँग्रेस, राष्ट्रवादी आणि दोन्ही काँग्रेसबरोबर असलेले अपक्ष यांचे एकूण संख्याबळ १७९ होते. भाजप, शिवसेना, शेकाप आणि काही अपक्ष यांचे संख्याबळ हे ९८ आहे. यामुळे राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे हे सहज विजयी होऊ शकतात. पण या लढाईत एकमेकांची मते फोडण्याची स्पर्धा लागल्याने विजयापेक्षा कोण कोणाची किती मते फोडतो, याचीच आकडेमोड सुरू आहे.
पवार आणि मुंडे यांच्यातील जुन्या संघर्षांत एकमेकांचे हिशेब चुकते करण्यावर भर आहे. पुतण्याला धक्का देण्यासाठी स्वत: मुंडे मैदानात उतरले आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील कटुता किंवा पुढील निवडणुकीत गळाला लागू शकतील अशा सत्ताधारी आघाडीतील आमदारांची मते मिळविण्याचा गोपीनाथ मुंडे यांचा प्रयत्न आहे. काँग्रेसच्या काही मतांची बेगमी होते का, याचीही चाचपणी करण्यात आल्याचे भाजपच्या वर्तुळातून सांगण्यात येते.
गोपीनाथ मुंडे यांनाच राजकीय धक्का देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे नेते सरसावले आहेत. भाजप आणि शिवसेनेतील काही आमदार हे राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत. यातूनच युतीच्या एकूण मतांपेक्षा कमी मते विरोधी उमेदवाराला मिळतील या दृष्टीने राष्ट्रवादीचे प्रयत्न सुरू होते. पोटनिवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांची रविवारी रात्री बैठक आणि स्नेहभोजनाचा कार्यक्रम पार पडला. अलीकडेच झालेल्या विधान परिषदेच्या औरंगाबाद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने सहकार्य केल्याने काँग्रेसचा उमेदवार निवडून आला. परिणामी या पोटनिवडणुकीत काँग्रेस कुरापत काढण्याची शक्यता नाही.