योगाचा प्रचार व प्रसार वाढवून महाराष्ट्रात योगमय वातावरण निर्माण व्हावे, यासाठी २१ जून २०१६ या दिवशी आंतरराष्ट्रीय योग दिनासोबतच प्रत्येक महिन्याच्या २१ तारखेला राज्यभर शाळा, महाविद्यालये व विद्यापीठ स्तरावर योग दिन साजरा करण्याबाबतचे निर्देश शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी येथे दिले.
राज्यात योग दिन साजरा करण्याबाबतच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. शासनाच्या विविध विभागांमार्फत जिल्हास्तरीय योग दिन समिती स्थापन करुन या समितीने आपापल्या जिल्ह्यांमध्ये वर्षातून एकदा योग महोत्सव साजरा करण्याबाबतचा विचार व नियोजन करावे तसेच जिल्हास्तरीय समितीवर नियंत्रण करणारे राज्यस्तरीय समिती स्थापन करण्याबाबतचे निर्देशही तावडे यांनी यावेळी दिले. योगाचा प्रचार व प्रसार करणाऱ्या संस्थांनीही या कामी सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले.
शैक्षणिक आणि महाविद्यालयीन परिसरात योगदिन साजरा करण्यात येणार असून, त्यादृष्टीने योग दिनाची जागृती आणि योग साधना ही आरोग्य बळकट असणारी आणि सर्वसमावेशक असावी, अशी जनजागृती करण्याचा मनोदय या बैठकीत व्यक्त करण्यात आला. २१ जून या आंतरराष्ट्रीय योग दिनासोबतच प्रत्येक महिन्याच्या २१ तारखेला राज्यभर शाळा, महाविद्यालये व विद्यापीठ स्तरावर योग दिन साजराकरावा असे तावडे यांनी सांगितले.