तुर्भे सेक्टर २२ येथील एका इमारतीतील दुसऱ्या मजल्यावरील छताचा भाग कोसळल्याने गंभीर जखमी होऊन एका सतरा वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. या प्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शिवकृपा ही जीप्लस टू टाईपची अशोक शिंदे यांच्या मालकीची इमारत आहे. सकाळी सात वाजण्याच्या सुमारास दुसऱ्या मजल्यावर अचानक जोरदार आवाज झाला. त्या ठिकाणी त्यांचा मुलगा अक्षय हा झोपला असल्याने त्यांच्या पत्नीने त्या ठिकाणी धाव घेतली. अक्षय झोपलेला असलेल्या ठिकाणाच्या छताचा भाग मोठय़ा प्रमाणात कोसळला असल्याचे त्यांनी पाहिले. या वेळी त्यांनी त्याच्या अंगावर पडलेला मलबा दूर केला. यात अक्षय याच्या हाताला मार लागला होता. तसेच छातीत दुखत असल्याने त्याला तातडीने वाशीतील एमजीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती वरिष्ठ
पोलीस निरीक्षक माया मोरे यांनी दिली आहे.