बदलापूरमध्ये लघुशंका करताना रोखले म्हणून एका पोलिसाला अज्ञात व्यक्तींनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मारुती कोहिणकर असे या पोलिसाचे नाव असून गेल्या महिनाभरापासून ते सुट्टीवर होते.

बदलापूर पूर्वमधील कात्रप परिसरात श्री साईदीप अपार्टमेंटमध्ये मारुती कोहिणकर राहतात. कोहिणकर हे बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात ड्यूटीवर आहेत. गेल्या महिनाभरापासून कोहिणकर यांना पाठदुखीचा त्रास होत असल्याने ते सुट्टीवरआहेत. गुरुवारी रात्री जेवण झाल्यावर कोहिणकर शतपावलीसाठी घराबाहेर पडले होते. यादरम्यान परिसरातील शुभम हॉटेलमधून काही तरुण बाहेर पडले. या तरुणांनी हॉटेलच्या बाहेरच लघुशंका केली. कोहिणकर यांनी या तरुणांना लघुशंका करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. यावरुन वादावादी झाली आणि वादावादीचे पर्यावसन मारहाणीत झाले. त्या टोळक्याने कोहिणकर यांना अमानूष मारहाण केली असून मारहाणीत कोहिणकर यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. कोहिणकर यांना २० टाके पडले असून या प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बदलापूर पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरु केला असून सध्या हॉटेलबाहेरील सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहे.  क्षुल्लक कारणावरुन अमानूष मारहाण करणाच्या या घटनेचा शहरात संताप व्यक्त होत असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.