गोरेगावच्या चित्रनगरी येथे एका तरुणाने झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. मनोज कुमार बेहरा (३२) असे त्याचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी त्याने लिहिलेली चिठ्ठी आणि खिशात ९ हजार रुपये सापडले आहेत. हे पैसे माझ्या अंत्यसंस्कारासाठी वापरावेत असे आवाहन त्याने या चिठ्ठीत केले आहे.
    मनोजकुमार मूळचा ओरिसाचा असून गोरेगावच्या संतोष नगरमध्ये एकटाच राहत होता. गेल्या तीन वर्षांपासून तो मालाडच्या एका खासगी कंपनीत काम करत होता. रविवारी सकाळी गोरेगावच्या चित्रनगरीत प्रभात फेरीसाठी गेलेल्या लोकांना गळफास लावलेल्या अवस्थेत मनोजचा मृतदेह आढळला. त्याच्या खिशात ९ हजार रुपये आणि चिठ्ठी होती. दिंडोशी पोलिसांनी याप्रकरणी अपमृत्यूची नोंद केली असून त्याच्या नातेवाईकांचा शोध घेतल्यानंतर त्यांच्याकडे मृतदेह सोपविला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.