वाहन परवान्याची मागणी करणाऱ्या एका पोलिसाला तरुण मोटारसायकलस्वाराने कॉलरला पकडून फरफटत नेले. या घटनेत पोलीस जखमी झाला असून उपस्थितांनी पाठलाग करून या तरुणाला पकडले. बोरीवलीत मंगळवारी दुपारी ही घटना घडली.
 सोनसाखळी चोरी रोखण्यासाठी बोरीवली पोलिसांनी जागोजागी पोलीस बंदोबस्त ठेवला होता. मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास देविदास लेन येथे बोरीवली पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार जगदीश झेंडे हे बंदोबस्तावर होते. त्या वेळी मोटारसायकलवरून जात असलेल्या एका २२ वर्षीय तरुणाला त्यांनी अडवले आणि परवाना तसेच कागदपत्रांची मागणी केली. मी कागदपत्रे घरी विसरलो, असे तरुणाने सांगितले. मात्र झेंडे यांनी घरी जाऊन कागदपत्रे आणून दे, असे सांगितले. त्या वेळी मोटारसायकल बाजूला लावण्याचा बहाणा करत संबंधित तरुणाने पळायचा प्रयत्न केला. तेव्हा झेंडे यांनी त्याला अडवताच त्याने झेंडे यांची कॉलर पकडून त्यांना फरफटत नेले. सुमारे शंभर मीटर अंतरापर्यंत झेंडे फरफटत गेले. त्या ठिकाणी उपस्थित तीन तरुणांनी या तरुणाला पकडले.