आतापर्यंत आपण नृत्याशी निगडित विविध विषयांचा आढावा घेतला, परंतु आजचा विषय हा थोडा निराळा आहे. दुसऱ्या शतकात आचार्य नंदिकेश्वरांनी लिहिलेला अभिनयदर्पण हा ग्रंथ शास्त्रीय नृत्याच्या अभ्यासकांसाठी एक महत्त्वपूर्ण ग्रंथ मानला जातो. प्रस्तुत ग्रंथामध्ये नृत्याशी निगडित अनेकविध विषय समाविष्ट केले आहेत. त्यापकीच एक ‘नर्तकीची लक्षणे’. नृत्य करणारी नर्तकी कशी असावी याचे अतिशय मार्मिक वर्णन आचार्यानी एका श्लोकातून केले आहे. त्यालाच ‘पात्रलक्षण’ असे संबोधले आहे.

पात्रलक्षण :-
तन्वी रूपवती श्यामा पिनोन्नत पयोधरा।
प्रगल्भा सरसा कान्ता कुशला ग्रहमो क्षयो।।
विशाललोचना गीत वाद्य तालानुवíतनी
पराध्र्यभूषासम्पंना प्रसन्नमुखपंकजा।।
एवंविध गुणोपेता नर्तकी समुदिरिता।

Loksatta kutuhal Artificial intelligence that avoids potholes
कुतूहल: खड्डे चुकवणारी कृत्रिम बुद्धिमत्ता!
mpsc mantra study current affairs State National International Level Events
mpsc मंत्र: चालू घडामोडी अभ्यासाचा ‘आधार’
talathi bharti
तलाठी भरतीच्या सुधारित गुणवत्ता यादीत अनेक अपात्र; ७० संशयितांचा निकालही थांबवला
mpsc mantra environment question analysis career
mpsc मंत्र: पर्यावरण प्रश्न विश्लेषण

पात्रप्राण :-
जव: स्थिरत्वं रेखाच भ्रमरी द्रृष्टीरश्रमा ।
मेधा श्रद्धा वचोगीतं पात्राप्राणा दश: स्मृता:।।
एवंविधेत पात्रेण नृत्यकार्य विधानत

पात्रलक्षण व पात्रप्राण या शीर्षकाखाली येणारे हे दोन श्लोक चांगली नर्तकी होण्यासाठी लागणाऱ्या सर्व गुणांचं विवरण देतात. पात्रलक्षण नर्तकीच्या बाह्य़गुणांची तर पात्रप्राण नर्तकीच्या प्राण गुणांची व्याख्या सांगतात.
पात्रलक्षण : पात्र म्हणजे मुख्य नर्तकी, तेव्हा पात्रलक्षण म्हणजे मुख्य नर्तकीची लक्षणे. आदर्श नर्तकी कशी असावी याची व्याख्या आचार्य नंदिकेश्वर या श्लोकांत करतात. तर ती ‘तन्वी’ म्हणजे ‘कमनीय’, ‘रूपवती’, अर्थात रूपवान, ‘श्यामा’ म्हणजे ‘तरुण’ आणि ‘पिनोन्नतपयोधरा’ म्हणजेच ‘सुडौल बांध्याची’ असावी, कारण नृत्याचं माध्यम शरीर असल्याने माध्यम म्हणजेच शरीर सुरूप असल्याशिवाय नृत्य सुंदर दिसणार नाही, तसेच मुख्य नर्तकी प्रगल्भा-प्रगल्भ व कुशाग्र बुद्धीची, सरसा-रसिक आणि संवेदनशील, ‘कान्ता’ – चांगली अंगकांती असलेली आणि ‘कुशलाग्रहमोक्षयो:’. नृत्याचा आरंभ आणि अंताचा मर्म जाणणारी असावी. नर्तकीची बुद्धी कुशाग्र असल्याशिवाय तिला नृत्याचे तंत्र शिकता येणार नाही, तसेच त्या तंत्राचा वापर सौंदार्यात्मिक तऱ्हेने करण्यासाठीसुद्धा तिच्याकडे बुद्धिमत्ता असायलाच पाहिजे. नुसतीच बुद्धिमत्ता नव्हे, तर रसिकता म्हणजेच नृत्याबरोबरच इतरही कलांचा आस्वाद घेण्याची इच्छा आणि क्षमता तिच्यात असावयास हवी, कारण नृत्य ही सर्वसमावेशक कला आहे. तिचा संबंध गायन, वादन, साहित्य, चित्र, शिल्प या सर्वाशी येतो. तेव्हा नर्तकीचे नृत्य अधिकाधिक समृद्ध आणि सौंदर्यपूर्ण होण्यासाठी नर्तकी रसिक असावी, तरच ती या सर्व कलांचा उपयोग आपल्या नृत्यासाठी करून घेऊ शकेल. ती नृत्याचा आरंभ आणि अंताचा मर्म जाणणारी असावी, म्हणजे नृत्य अधिकाधिक सुंदर आणि उत्कंठावर्धक होण्यासाठी तालाच्या चक्रात, उपलब्ध जागेत, उपलब्ध वेळेत नृत्य कुठे आणि कसे सुरू करावे व कसे संपवावे याची उत्तम जाण नर्तकीला असायला पाहिजे. ती ‘विशाललोचना’- मोठय़ा डोळ्यांची आणि ‘गीतवाद्यतालानुवाíतनी’ – गायन, वादन आणि ताल या तिन्हींना समजून त्यांचे अनुसरण करणारी असावी. भावप्रदर्शनाचं सर्वात महत्त्वाचं आणि प्रभावी माध्यम म्हणजे डोळे. तेव्हा नर्तकीचे डोळे मोठे असावेत, जेणेकरून सर्वात लांबून नृत्य पाहणाऱ्यांपर्यंतदेखील सर्व भाव पोहोचावेत. संगीताशिवाय नृत्याचा विचार होऊच शकत नाही. तेव्हा नर्तकीची गायन, वादन व तालाची समज व या तिन्हींना अनुसरण्याची तिची क्षमता हे ‘पराध्र्यभूषासम्पना’- उत्तम वेशभूषा करणारी आणि ‘प्रसन्नमुखपंकजा’- कमळाप्रमाणे उत्फुल्ल चेहऱ्याची असावी, अभिनयदर्पणाप्रमाणे उपरोक्तसर्व गुणांनी युक्त स्त्रीच मुख्य नर्तकी होण्यास पात्र असते.
अभिनयदर्पणांत पात्रलक्षणां-प्रमाणेच दहा पात्रप्राणदेखील सांगितले आहेत. हे पात्रप्राण म्हणजे नर्तकीच्या तांत्रिक बुद्धिमत्तेचे मानदंड होत. ‘जव’- वेग किंवा चपळता – नर्तकीच्या हालचालींना वेग आणि चपळपणा असावा, पण त्याचबरोबर ‘स्थिरत्व’ – स्थर्यसुद्धा हवे अर्थात वेगवान म्हणजे अस्थिर नव्हे, तसेच स्थिर म्हणजे स्तब्ध नव्हे, याची समज नर्तकीला असायला हवी. तात्पर्य, वेग आणि स्थर्य यांचा संतुलित मेळ नर्तकीने साधावा. तिला रेषेचं ज्ञान हवं कारण ती शरीराच्या मदतीने उपलब्ध अवकाशात आकृतिबंध रेखाटन असते तेव्हा रेष, तिची दिशा, बघणाऱ्यावर होणारे रेषेचे – दिशेचे परिणाम याचं उत्तम ज्ञान नर्तकीस असावं, ती भ्रमरी घेण्यात निपुण आणि ‘अश्रमा’ म्हणजे जिचा दम दीर्घकाळ टिकेल अशी असावी. ती बुद्धिवान असावी आणि नृत्यावर, गुरुवर, कलेवर श्रद्धा असणारी असावी. कारण बुद्धी आणि श्रद्धा दोन्ही असल्याशिवाय कोणीही कुठलीही कला आत्मसात करू शकत नाही. तिची वाणीही शुद्ध असावी आणि तिला बोलण्याची कला अवगत असावी. तसेच तिला गाण्याची समज असावी. असे हे दहा प्राणगुण जिच्यात असतील तिनेच नृत्य करावे, असे अभिनयदर्पणात म्हटले आहे.
हजारो वर्षांपूर्वी लिहिलेले हे श्लोक आधुनिक काळालाही तितकेच लागू आहेत. पात्रलक्षणांमध्ये सांगितलेले शारीरिक सौंदर्याचे निकष जरी आज वेशभूषा व रंगभूषेच्या साहाय्याने पूर्ण करता आले आणि श्लोकाचा तेवढा भाग कालबाह्य़ झाला असं म्हटलं, तरीही उत्तम नर्तकी होण्यासाठी लागणारे बौद्धिक गुण आजही तेच आहेत आणि तितकेच, किंबहुना पूर्वीपेक्षाही जास्त गरजेचे आहेत. बदलत्या काळानुसार कलेच्या सादरीकरणात होणारे बदल, सर्वच कलांना मिळणारी अफाट प्रसिद्धी, विविध कलाप्रकारांचा एकमेकांशी सहज येऊ शकणारा व येऊ लागलेला संबंध, त्यांच्यामध्ये होणारी देवाणघेवाण आणि या सर्वाबरोबरीने येणारी व्यावसायिक स्पर्धात्मकता, या सर्वामध्ये आपली कला अधिकाधिक समृद्ध आणि नावीन्यपूर्ण करण्याकरिता नर्तकी ‘प्रगल्भा’, ‘सरसा’, ‘कुशलाग्रहमोक्षयो:’ असायलाच पाहिजे. उदा. एखाद्या नवीन संगीतप्रकाराबरोबर नृत्याचा प्रयोग करायचा झाल्यास तो संगीतप्रकार समजण्यासाठी कुशाग्र बुद्धी आणि संवेदनशीलता, तसेच रसिकता हवी किंवा बदलत्या काळानुसार कमीत-कमी ते अधिकाधिक अशा विविध कालावधींमध्ये नृत्यप्रस्तुती देण्यासाठी ‘ग्रहमोक्षा’चे कुशल ज्ञान हवेच. उदा. दहा मिनिटांच्या प्रस्तुतीची विषयवस्तू, लय इ. अध्र्या किंवा एक तासाच्या प्रस्तुतीपेक्षा वेगळी असावयास हवी. अर्थात विलंबित ते द्रुतच्या कालचक्रात नृत्य उपलब्ध वेळेनुसार कुठे सुरू करावं व कुठे संपवावं याचं भान आधुनिक युगात पूर्वीपेक्षाही जास्त असायला हवं. प्रत्येक वेळी नृत्याला उपलब्ध जागा एकसारखी नसते तेव्हा कमी-अधिक जागेनुसार नृत्याची मांडणी करायला हवी. काळाबरोबर नृत्याचे विषय बदलत आहेत, बदलत राहतील, अनेकानेक अमूर्त विषय आता नृत्यातून सदर होऊ लागले आहेत. तेव्हा भ्रमरी, रेषा यांचा नवनवीन विषयांच्या मांडणीत होऊ शकणाऱ्या उपयोगाची पूर्वीपेक्षाही जास्त जाण आता नर्तकीला असायला हवी, तरच ती उपलब्ध असलेल्या जुन्या शैलीतून नवीन आणि प्रासंगिक रचना करू शकेल. वेगवेगळ्या विषयांच्या मांडणीला वेशभूषा, रंगभूषा यांचा प्रभावी उपयोग करण्याकरता तिला वेशभूषेची, तसेच प्रकाशयोजनेच्या स्वरूपात येणाऱ्या वेगळ्या प्रकारच्या रंग(मंच) भूषेची समज असणे काळाप्रमाणे अत्याधिक गरजेचे झाले आहे. तेव्हा असे वाटते की शतकानुशतकांपूर्वी लिहिलेले हे श्लोक तेव्हापेक्षाही आताच्या आधुनिक काळात जास्त प्रासंगिक आहेत.
शीतल कपोले – response.lokprabha@expressindia.com