नृत्य म्हटलं की स्टेज परफॉर्मन्स किंवा सिनेमातील नृत्य डोळ्यांसमोर येतं, पण सध्या मोठय़ा प्रमाणात नृत्याची वाढत चाललेली बाजू आहे ती म्हणजे- ‘फिटनेस डान्सची!’ जसे जीवनशैलीमध्ये बदल होत गेले तसे फिटनेस फंडेही काळाबरोबर बदलत गेले. आजच्या फास्ट युगात आणि जंक फूडच्या जमान्यात ‘फिटनेस’चं महत्त्व अधिक प्रकर्षांने लोकांना जाणवू लागलंय आणि त्यासाठी विविध लोक विविध पद्धतींचा अवलंब करत आहेत. पारंपरिक व्यायामशाळेची जागा आधुनिक उपकरणांनी सुसज्ज अशा ‘जिम’ने घेतली, जुन्या योगाच्या वर्गानासुद्धा नवीन ‘पॉवर योगा’ने नवं रूप दिलं. पण तरीदेखील केवळ आसनं करणं किंवा जिममध्ये तोच तोच वर्कआऊट करणं कंटाळवाणं वाटू लागतं. मग अशा वेळेला पावलं वळतात- फिटनेस डान्स क्लासकडे!

खरं तर कुठलीही शारीरिक हालचाल योग्य पद्धतीने आणि ठरावीक गतीमध्ये केली की शरीराचा व्यायाम होतो. ज्यामुळे शरीर तंदुरुस्त राहण्यात आणि वजन कमी होण्यात मदत होते. पण केवळ वजन कमी करण्यासाठी किंवा फिट राहण्यासाठी नियमित व्यायाम करणं सगळ्यांनाच शक्य होत नाही किंवा आवडत नाही. मात्र हाच व्यायाम म्युझिकबरोबर डान्स स्टेप्सच्या स्वरूपात करायला बरेच लोक आनंदाने तयार होतात. सर्वात महत्त्वाचं कारणं म्हणजे नृत्यातून मिळणारा आनंद, कमी होणारा ताण आणि याबरोबरीनेच होणारा शरीराचा आवश्यक तो व्यायाम!! असे बहुआयामी फायदे फिटनेस डान्सिंगमुळे मिळत असल्याने विशेषत: तरुणांची अशा क्लासमध्ये चांगलीच गर्दी जमते. फिटनेसच्या उद्देशाने डान्स क्लासला नाव नोंदविणारे बहुधा भारतीय शास्त्रीय किंवा लोकनृत्यापेक्षा झुम्बा, एरोबिक या नृत्यशैलींना अधिक प्राधान्य देतात. त्याचबरोबर पिरोक्सिंग, बॅले, फास्ट बॉलरूम, फास्ट बॉलीवूड, पॉपअप डान्स अशा विविध नृत्यप्रकारांनादेखील फिटनेसच्या दृष्टीने विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. अशा नृत्यप्रकारांचे शरीराच्या आरोग्यासाठी विविध फायदे आढळून आले आहेत. स्नायूंची ताकद वाढते, कॅलरीज बर्न झाल्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते, त्याचबरोबर आजच्या काळातील परवलीचा शब्द म्हणजे -‘इंच लॉस’ (शरीरावरील अतिरिक्त मांस/चरबी कमी करणे) देखील नृत्य केल्याने साधता येतो. वाढत गेलेल्या कॉर्पोरेट जगात संगणकासमोर दिवसभर बसून काम केल्याने वजन वाढण्याचा धोका असतो, तसेच मानदुखी आणि पाठदुखीचे त्रासही अनेकांना खुणावू लागतात; तेव्हा कामातून वेळ काढून आरोग्यासाठी केलेला असा नृत्यरूपी व्यायाम फक्त शरीरालाच नाही तर मनालादेखील ताजेतवाने करतो आणि प्रसन्न ठेवण्यास मदत करतो.

साधारणत: हे फिटनेस क्लासेस ४५ मिनिटे किंवा एक तासाचे असतात, ज्यात सुरुवातीला वार्म अप, नंतर स्ट्रेचिंगचे व्यायाम आणि मग कार्डिओ (जलद गतीत केले जाणारे व्यायाम जे हृदयाच्या स्वास्थ्यासाठी केले जातात) व शेवटी शरीराला आराम देणारा ‘कूल डाऊन’ केला जातो. संशोधनामध्ये असे सिद्ध झाले आहे की एरोबिक्समुळे ५१० कॅलरीज एका तासात घटू शकतात, तर फास्ट बॉलरूममुळे २३८-३०६ पर्यंत कॅलरीज बर्न होतात. तर ५००-८०० कॅलरीज ‘झुम्बा’ केल्याने घटतात.

मुंबईत स्वत:चे फिटनेस डान्स क्लास असणाऱ्या श्रुती लिमये यांनी फिटनेस डान्सचं वाढत चाललेलं महत्त्व आणि त्याचा आरोग्यासाठी होणारा फायदा यावर त्यांचा अनुभव ‘लोकप्रभा’बरोबर सांगितला. त्या ‘झुम्बा’ व ‘बोक्वा’ या दोन फिटनेस नृत्यप्रकारांचे प्रशिक्षण देतात. त्यांच्या क्लासबद्दल सांगताना त्या म्हणाल्या की, ‘आजकाल फिटनेस डान्सकडे बरेच लोक वळायला लागली आहेत, कारण अशा क्लासमध्ये फक्त नृत्य शिकले जात नाही तर मनोरंजनसुद्धा होतं. एका क्लासमध्ये आठ-दहा गाणी घेतली जातात. त्याच्या स्टेप्स अशा प्रकारे केल्या जातात, ज्यामध्ये नृत्य करतानाच शारीरिक व्यायाम पण होतो. म्हणजे साइड किक्स, स्ट्रेचिंग, बेंडिंग असे विविध शारीरिक व्यायामांनी युक्त अशा स्टेप्स बसवल्या जातात. झुम्बामध्ये पण खूप प्रकार आहे. पाण्यात केला जाणारा ‘अ‍ॅक्वा झुम्बा’, वजन हातात घेऊन केला जाणारा झुम्बा, स्टेप बोर्डवर केला जाणारा झुम्बा असे विविध प्रकार आहेत. आपला उद्देश आणि क्षमता बघून आपण झुम्बा प्रकार निवडू शकतो. जिममध्ये तेच तेच व्यायाम प्रकार करण्यापेक्षा बरेच जण विविधता असलेल्या आणि ट्रेनरचं नियमित मार्गदर्शन मिळणारे असे फिटनेस डान्स क्लास निवडतात. तसेच महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे सामुदायिक व्यायामाचा! एकटय़ाने घरी किंवा जिममध्ये जाऊन व्यायाम करण्यापेक्षा ग्रुपमध्ये व्यायाम केल्याने कंटाळा येत नाही, त्यामुळे नियमित आणि सातत्याने व्यायाम होतो. व्यायाम करण्याचा उत्साह वाढतो आणि त्यामुळे व्यायामाच्या सुट्टय़ादेखील कमी होतात!! ‘बोक्वा’ हा नवीन फिटनेस डान्स प्रकार आहे. ज्यात अंक आणि अक्षरे यांचे आकार व्यायाम करताना डान्स स्टेप्सच्या सहायाने काढले जातात. त्यामुळे व्यायामाबरोबरच कल्पकतादेखील वाढते. अशा फिटनेस डान्स क्लासला महिलावर्गाची पसंत जास्त मिळत असली तरी कंपनी असेल तर मुलंसुद्धा अशा क्लासला जाताना दिसतात.

एकंदर हा फिटनेस डान्सचा वाढता ट्रेंड फक्त क्लासमध्ये नाही तर यूटय़ूबवरसुद्धा अशा फिटनेस डान्स सेशनचे अनेक व्हिडीओज् बघायला मिळतात. अनेक व्हिडीओ लोकप्रियदेखील ठरले आहेत. एक लाखाच्या वर लोकांनी हे व्हिडीओज् पाहिले आहेत. बॉलीवूड अभिनेत्री बिपाशा बासूचेदेखील ३० मिनिटांचे अशा एरोबिक्स आणि फिटनेस वर्कआऊटचे व्हिडीओज् यूटय़ूबवर बघायला मिळतात, जे तब्बल ४० लाखांहून अधिक लोकांनी पाहिले आहेत!! घरच्या घरी आपल्या सोयीप्रमाणे व्यायाम करण्यासाठी असे इंटरनेटवरचे व्हिडीओज् उपयोगी ठरतात. पण तरीदेखील जर असा मुद्दामहून वेळ काढणं आणि एकटय़ाने घरी व्यायाम करणं कंटाळवाणं होऊ  शकतं; त्यामुळेच नंतर लोक फिटनेस क्लासला जाणे पसंत करतात.

हा फिटनेस डान्सचा ग्लोबल ट्रेंड डान्स मार्गदर्शक, नर्तक आणि तंदुरुस्त राहण्याची इच्छा असलेल्या सर्वानाच फायद्याचा ठरत आहे! तुम्ही कसली वाट बघत आहात, लवकरच हा फिटनेस डान्सचा फंडा तुम्हीपण ट्राय करून बघा आणि फिटनेसच्या दिशेने एक नवीन पाऊल टाकायला समर्थ व्हा!!

तेजाली कुंटे – response.lokprabha@expressindia.com