बीएनएचएस-इंडियाच्या महत्त्वपूर्ण पक्षी व जैवविविधता क्षेत्रे उपक्रमाअंतर्गत यापूर्वी निर्माण केलेल्या पक्ष्यांच्या प्रमाण मराठी नावांची सुधारित यादी सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील सावंतवाडी येथे आयोजित २९ व्या पक्षीमित्र संमेलनात प्रकाशित करण्यात आली. संस्थेचे प्रकल्प अधिकारी डॉ. राजू कसंबे यांनी संकलित केलेल्या यादीचे प्रकाशन महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनाचे अध्यक्ष भाऊ काटदरे, सावंतवाडीच्या राजमाता सत्त्वशिलादेवी भोसले, संमेलनाचे अध्यक्ष शरद आपटे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या सुधारित यादीत ११ नवीन नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. एकाच पक्ष्याची स्थानिक स्तरावर विविध नावे असल्याने जो गोंधळ निर्माण होतो त्यास या यादीमुळे आळा बसणार आहे.
गेल्या वर्षी पुण्यात झालेल्या पक्षीमित्र संमेलनात पहिली प्रमाण यादी बीएनएचएसतर्फे सादर करण्यात आली होती. त्यानंतर एक प्राथमिक यादी प्रकाशित करून त्यावर पक्षीप्रेमी व अभ्यासकांना प्रतिक्रिया, सूचना व बदल सुचवण्याचे आवाहन करण्यात आले होते. मग वर्षभरात महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेल्या प्रतिक्रियांवर काम करून सुधारित यादी पक्षीमित्र कार्यकारी समितीकडे पाठवण्यात आली. त्यांच्या मान्यतेनंतर पुस्तकाच्या रूपात त्याचे प्रकाशन करण्यात आले. पूर्वी संकलित केलेल्या यादीत महाराष्ट्रात अलीकडे झालेल्या पक्ष्यांच्या नोंदीची भर पडल्याने सुधारित यादीत एकूण ५७७ प्रजातींच्या नावांचा समावेश आहे. पक्ष्यांची नावे मातृभाषेत भाषांतरित केल्याने जास्तीत जास्त सामान्य मराठी जनतेच्या मनात पक्षी निरीक्षणाविषयी आवड निर्माण होण्यास प्रोत्साहन मिळेल, तसेच पक्ष्यांची माहिती सर्व स्तरातील लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल.
एकाच पक्ष्याची स्थानिक स्तरावर विविध नावे असल्याने जो गोंधळ निर्माण होतो त्यास आळा बसण्याचे कार्य या यादीमुळे होणार आहे. ही यादी बनवताना नामकरणासाठी जी नियमावली वापरली गेली त्यात प्रथम गोत्राचे नाव ठरवून मग पक्ष्यांच्या शास्त्रीय नावांचा अर्थ समजून व तर्क वापरून योग्य मराठी नाव ठरवण्यात आले. नावे शक्यतोवर सोप्या मराठी भाषेत असतील, असा प्रयत्न करण्यात आला, पण आधीपासून प्रचलित असलेली काही नावे तशीच ठेवण्यात आली. मराठी भाषेतून पक्ष्यांचा अभ्यास करण्यास प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने बीएनएचएस व महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलन प्रयत्नशील असल्याचे डॉ. राजू कसंबे यांनी सांगितले.

मराठीत पक्ष्यांना एक प्रमाण नाव
संपूर्ण भारतात पक्षी, तसेच अन्य वन्यजीवांची विविधता आढळते. विविधतेतून निर्माण झालेल्या सांस्कृतिक विविधतेमुळे प्रत्येक भाषेत पशुपक्ष्यांची निरनिराठी नावे रूढ आहेत. कोकणापासून विदर्भापर्यंत संपूर्ण राज्यातील अभ्यासक, निरीक्षक व निसर्गप्रेमींचा गोंधळ होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे सर्व प्रजातींची शास्त्रीय नावे जगभरात एकच ठरविलेली आहेत, त्याप्रमाणे मराठीत सर्व पक्ष्यांना एक प्रमाण नाव असावे, या उद्देशाने ही यादी प्रकाशित करण्यात आली आहे.

नवे पाहुणे

सुधारित यादीत नव्याने समाविष्ट केलेल्या पक्ष्यांमध्ये समुद्री पाणडुबी, मोठा तापस, पांढऱ्या माथ्याचा कलहंस, लाल मानेचा फलारोप, लाल फलारोप, प्राच्य शिंगळा घुबड, नारिंगी छातीची हारोळी, लाल छातीचा पोपट, लाल पंखांचा चातक, वाळवंटी वटवटय़ा व पांढरी-निळी माशीमार या पक्ष्यांचा समावेश आहे.