विभागातील बळींची संख्या ४० वर

नागपूर विभागात गेल्या पंधरा दिवसांत १५ नागरिकांना स्वाईन फ्लूची लागण झाली असून उपचारादरम्यान त्यातील एकाचा मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाच्या नोंदीनुसार शहरातील विविध रुग्णालयांत ११ स्वाईन फ्लूच्या रुग्णांवर उपचार सुरू असून त्यातील ५ जण जीवरक्षक (व्हेंटिलेटर) प्रणालीवर आहेत.

संतोष सूरजलाल मोहबे (४९) रा. तुमसर, भंडारा असे मृत्यू झालेल्या रुग्णाचे नाव आहे. त्याच्या मृत्यूमुळे विभागात स्वाईन फ्लू बळींची संख्या ४० वर गेली आहे. संतोषला सर्दी, खोकला, तापासह इतर त्रास असल्यामुळे नातेवाईकांनी प्रथम जवळच्या खासगी दवाखान्यात नेले. प्रकृती खालावल्यावर त्याला प्रथम तुमसरच्या व त्यानंतर नागपूरच्या वोक्हार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीत त्याला स्वाईन फ्लू असल्याचे निष्पन्न झाले होते. आरोग्य विभागाच्या पाहणीत नागपूर विभागाच्या विविध रुग्णालयात ७  ते २२ ऑगस्टपर्यंत पंधरा दिवसांत स्वाईन फ्लूचे १६ नवीन रुग्ण आढळले आहेत.

अचानक रुग्ण वाढल्याचे लक्षात आल्यावर आरोग्य विभागाचे धाबे दणाणले असून त्यांनी त्वरित सर्व शासकीय रुग्णालयांना दक्षतेच्या सूचना दिल्या आहेत. रुग्ण दाखल होताच वरिष्ठांना सूचना देऊन तातडीने उपचार करण्याचे व रुग्णांना औषधांसह आवश्यक साहित्य उपलब्ध करण्यास सांगितले आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, १ जानेवारी २०१७ ते आजपर्यंत नागपूर विभागात या आजाराची १६८ जणांना बाधा झाली, तर उपचारादरम्यान ४० जण दगावले. नागपुरात गेल्या काही दिवसांपासून चांगला पाऊस पडत असून पुन्हा तापमान कमी झाले आहे. हे तापमान स्वाईन फ्लूला पोषक आहे. त्यामुळे हा आजार आणखी वाढण्याचा धोका या क्षेत्रातील जाणकार व्यक्त करीत आहेत.

महापालिका रुग्णालयांत उपचाराची सोय नाही

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या समितीने तीन वर्षांपूर्वी नागपूर महापालिकेला त्यांच्या रुग्णालयांत स्वाईन फ्लूग्रस्तांना दाखल करून उपचाराच्या सुविधा देण्याचे आदेश दिले होते, परंतु त्याला महापालिकेच्या आरोग्य विभागाने हरताळ फासला आहे. मेडिकलमध्ये स्वाईन फ्लूची तपासणी उपलब्ध करून देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्यमंत्री, वैद्यकीय शिक्षणमंत्री, नागपूरच्या पालकमंत्र्यांनी वारंवार केल्या, परंतु त्याही फोल ठरल्या.

स्वाईन फ्लू वार्ड ठरला पांढरा हत्ती

नागपूरच्या मेडिकलमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून स्वतंत्र स्वाईन फ्लू वार्ड गेल्या अनेक महिन्यांपासून तयार आहे, परंतु शासनाकडून अद्याप या वार्डाच्या फर्निचरकरिता आवश्यक निधी व स्वतंत्र मनुष्यबळ दिले गेले नाही. त्यामुळे ही वास्तू पांढरा हत्ती म्हणून ठरत असल्याचे चित्र आहे.