‘सीसीटीव्ही’च्या नजरेत प्रथमच प्रक्रिया

नागपूर लोहमार्ग पोलीस जिल्ह्य़ातील पोलीस शिपायांच्या एकूण ३८ पदांकरिता अजनीमध्ये मैदानी परीक्षा सुरू आहे. १० हजार १९९ उमेदवारांपैकी २० टक्के उमेदवार हे पदव्युत्तर शिक्षण झालेले असून त्यात एमबीएसह अभियांत्रिकी झालेल्यांचाही समावेश आहे. पारदर्शी प्रक्रियेकरिता प्रथमच प्रशासनाकडून सीसीटीव्ही कॅमेरांच्या नजरेत ही परीक्षा होत असून गेल्या चार दिवसांत ६२ टक्के उमेदवारांनी हजेरी लावली आहे, अशी माहिती लोहमार्ग पोलीस नागपूर जिल्ह्य़ाचे पोलीस अधीक्षक साहेबराव पाटील यांनी दिली. या पदाकरिता केवळ बारावी पास शिक्षणाची अट आहे.

एकूण पदांपैकी १२ महिला विविध संवर्गाकरिता आरक्षित आहेत. लोहमार्गच्या मैदानी पद्धतीच्या विविध ५ संवर्गातील प्रत्येक खेळाचे व्हिडीओ रेकॉर्डिंग होत असून उमेदवारांना शंका असल्यास ते त्वरित बघण्याची सोय आहे. गेल्या चार दिवसांत परीक्षेकरिता २,८०० जणांना बोलावण्यात आले. त्यातील ८१ जण उंची, छातीसह विविध निकशात बसत नसल्याने त्यांना अपात्र करण्यात आले. तर १ हजार ६५० जण परीक्षेत पात्र ठरले. परीक्षेकरिता लोहमार्गचे ४२ अधिकारी व २१० कर्मचारी लावण्यात आले आहे. उमेदवारांकरिता मैदान परिसरात शरबत, पिण्याचे शुद्ध व थंड पाणी, थांबण्याकरिता जागा, स्वच्छतागृहासह शौचालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक प्रक्रिया पारदर्शी व्हावी म्हणून सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बारिक-सारिक गोष्टीकडे लक्ष असून उमेदवारांना तक्रार करायची असल्यास लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे दूरध्वनी क्रमांकही येथे लावण्यात आले आहे. अद्याप महिला संवर्गातील परीक्षा सुरू झाली नसून ती ३० मार्च आणि ४ एप्रिलला करण्यात येईल, अशी माहिती पोलीस अधीक्षक साहेबराव पाटील यांनी दिली. पत्रकार परिषदेला अपर पोलीस अधीक्षक दत्ताराम राठोड, पोलीस निरीक्षक अभय पान्हेकर उपस्थित होते.

रेल्वेच्या सुरक्षेकरिता गँगमनच्या कामावर पोलिसांची नजर

नागपूर ते इगतपुरी दरम्यानचे रेल्वे रूळ, त्यावरून धावणाऱ्या रेल्वे गाडय़ा, त्यातील लाखो प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी लोहमार्ग पोलिसांकडून नवीन पंचसूत्रीवर काम सुरू आहे. त्याअंतर्गत रेल्वे रुळाचे निरीक्षण करणाऱ्या गँगमॅनशी पोलीस संवाद वाढवून त्यांच्या कामावर लक्ष ठेवत आहे, अशी माहिती साहेबराव पाटील यांनी दिली. रेल्वेच्या गँगमनकडे पूर्वी प्रत्येक ३ किलोमीटरचे रेल्वे रूळ निरीक्षणाकरिता असायचे. आता ते १ किलोमीटरच्या जवळपासचा आहे. या कर्मचाऱ्यांकडून लोहमार्ग पोलिसांना सुरक्षेसंबंधित बरीच मदत शक्य असल्याने त्यांनी या कर्मचाऱ्यांच्या संघटनेसोबत बैठक घेतली. रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांशीही चर्चा केली. गँगमन रुळाचे निरीक्षण करतो काय, केल्यास काही संशयास्पद आढळले काय ही माहिती रोज मुख्यालय घेत असून काही संशयास्पद दिसताच तेथे निरीक्षण करून संभाव्य धोके टाळल्या जात आहे. काही भागात सिग्नलची विशिष्ट केबल कापल्यामुळे सिग्नल बंद होऊन अपघात घडल्याचे पुढे आले आहे. हा प्रकार करणाऱ्यांमध्ये रेल्वेशी संबंधित कंत्राटदाराचा वा रेल्वेचा आजी वा माजी कर्मचाऱ्यांचाही हात असल्याचे नाकारता येत नाही. तेव्हा या बाबींवर लोहमार्ग पोलिसांची बारिक नजर आहे असल्याची माहिती, साहेबराव पाटील यांनी दिली.