काही बडय़ा नेत्यांच्या मृत्यूमुळे चळवळीला हादरा

आंध्र प्रदेश व ओदिशाच्या सीमेवरील जंगलात सोमवारी पहाटे पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत २४ नक्षलवादी ठार झाले. मृतांमध्ये काही बडय़ा नक्षल नेत्यांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे. एवढय़ा मोठय़ा संख्येने नक्षलवादी ठार होण्याची ही पहिलीच घटना असून यामुळे या चळवळीला मोठा हादरा बसला आहे.

या दोन राज्यांच्या सीमेवरील जंगलात एका महत्त्वाच्या बैठकीसाठी नक्षलवादी जमणार असून त्यात केंद्रीय समितीचा सदस्य व ओदिशा-आंध्र प्रदेश झोनचा प्रमुख रामकृष्णाही सहभागी होत आहे, अशी माहिती आंध्रच्या ग्रेहाऊंड पथकाला मिळाल्यानंतर रविवारी सायंकाळी या भागात शोधमोहीम हाती घेण्यात आली. यात दोन्ही राज्यांचे शंभर जवान सहभागी झाले होते. रात्री उशिरा मलकानगिरी जिल्ह्य़ातील बेजंगीच्या जंगलात पानासपूत गावाजवळ पोलीस व नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली. सोमवारी पहाटेपर्यंत झालेल्या या चकमकीत तब्बल २४ नक्षलवादी ठार झाले. यात गजरला रवी, रामय्या, रामकृष्णाचा मुलगा मुन्ना, अरुण, चलपती, दया, सुरेश बंगाली या जहाल नक्षलवाद्यांचा समावेश आहे.

या चकमकीच्या ठिकाणी हजर असलेला रामकृष्णा पळून गेला की मारला गेल्यावर त्याचा मृतदेह नक्षलवाद्यांनी नेला, याविषयी पोलिसांकडून अधिकृत माहिती मिळालेली नाही. काही वर्षांपूर्वी आंध्र प्रदेश सरकारने नक्षलवाद्यांशी चर्चा सुरू केली तेव्हा रामकृष्णाने पुढाकार घेतला होता. यात ठार झालेल्या नक्षलवाद्यांवर २० लाखांपेक्षा जास्त रकमेची बक्षिसे होती, अशी माहिती विशाखापट्टणम् पोलिसांनी दिली. या भीषण चकमकीत आठ महिला नक्षलवादीसुद्धा ठार झाल्या. या कारवाईनंतर घटनास्थळावरून पोलिसांनी तीन एके ४७ बंदुकांसह मोठा शस्त्रसाठा जप्त केला असून या परिसरात नक्षलवाद्यांचा शस्त्रतळ होता, असा दावा केला जात आहे. गजरला रवी ऊर्फ उदय हा जहाल नक्षलवादी या दोन्ही राज्याच्या आंतरराज्यीय सीमेवर गेल्या अनेक वर्षांपासून सक्रिय होता. त्याच्यावर ६० पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. तर कारवाईत ठार झालेल्या महिला नक्षलवाद्यांवर देखील सरकारने इनाम जाहीर केलेले होते. त्यामुळेच या नक्षलवाद्यांना पकडण्यासाठी पोलिसांकडून या भागात जोरदार शोधमोहिम राबविण्यात येत होती. मात्र, अखेर पोलिसांच्या कारवाईला यश मिळाल्याने हे नक्षलवादी ठार झाले.

मोठे यश

पोलिसांसोबतच्या चकमकीत एवढय़ा मोठय़ा संख्येने नक्षलवादी मारले जाण्याची ही पहिलीच घटना आहे. नक्षलवादी बैठक आटोपून आराम करीत असताना ही चकमक सुरू झाली. त्यामुळेच मोठे यश मिळाले व ग्रेहाऊंडचे दोन जवान गंभीर जखमी झाले, अशी माहिती आंध्र पोलिसांनी दिली. ठार झालेल्या सर्व नक्षलवाद्यांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले असून सोमवारी सायंकाळी हवाईमार्गाने ते मलकानगिरी पोलीस मुख्यालयात आणण्यात आले.