कुष्ठरोग मुक्तीचे लक्ष गाठणार कसे?

नागपूर जिल्ह्य़ात गेल्या साडेसहा वर्षांत ५ हजार ४९८ नवीन कुष्ठरुग्ण आढळले असून त्यात लहान मुलांची संख्या ४७५ आहे. सरकारने २०२० पर्यंत मुलांमध्ये आढळणाऱ्या कुष्ठरोगाचे शून्य लक्ष गाठण्याचे निश्चित केले असले तरी प्रत्येक वर्षी मुलांमध्ये हा आजार वाढत असल्याचे दिसून येत आहे.

केंद्र व राज्य सरकारकडून कुष्ठरोग निर्मूलनासाठी प्रत्येक वर्षी कोटय़वधी खर्च केले जातात. त्यानंतरही रुग्ण संख्या प्रत्येक वर्षी वाढतच आहे. आरोग्य विभागाने मात्र, जास्तीत जास्त रुग्णांपर्यंत पोहोचण्यात यश मिळत असल्यामुळे नवीन कुष्ठरुग्णांची संख्या जास्त दिसत असल्याचा दावा केला जातो. केंद्र सरकारने रोग नियंत्रणाकरिता २०२० पर्यंत तीन लक्ष्य निश्चित केले आहे. त्यानुसार यावर्षीपर्यंत रुग्ण संख्या शून्य करणे, मुलांमध्ये पूर्णपणे कुष्ठरोग नाहीसा करणे, प्रत्येक लाखात कुष्ठरोग आढळणाऱ्यांची संख्या १० हून खाली आणणे आदींचा समावेश आहे. लक्ष्य साध्य करण्याकरिता प्रत्येक वर्षी नागपूर जिल्ह्य़ात वर्षांतून दोन वेळा घरोघरी शोध मोहीम राबवली जाते. त्यातंर्गत नागपूर जिल्ह्य़ात गेल्या साडेसहा वर्षांमध्ये ५ हजार ४९८ रुग्णांमध्ये कुष्ठरोग आढळला. त्यात ८.६३ टक्के म्हणजेच ४७५ मुलांचा समावेश होता. या सर्व रुग्णांवर आरोग्य विभागाकडून औषधोपचार करण्यात आला. दरम्यान, नुकतेच ५ सप्टेंबर ते २० सप्टेंबर दरम्यान जिल्हात राबवलेल्या शोध मोहिमेत आणखी २२४ रुग्ण आढळले असून त्यात तब्बल २६ लहान मुलांचा समावेश आहे. प्रत्येक वर्षी कुष्ठरुग्णांची वाढणारी संख्या बघता या आजारावर निर्धारीत केलेल्या वर्षांपर्यंत नियंत्रण कसे मिळणार? याकडे नागपूरकरांचे लक्ष लागले आहे.