अधिकाऱ्यांना मात्र तक्रार अमान्य

स्थानिक लोकप्रतिनिधींच्या मागण्यांच्या रेटय़ामुळे रेल्वे मंत्रालयाकडून नवीन गाडी सुरू करण्याची घोषणा तर केली जाते परंतु त्या गाडीसाठी मार्ग उपलब्ध होत नसल्याने प्रवाशांना बराच वेळ ताटकळत बसावे लागत असल्याचे दिसून येत आहे.
जोधपूर-पुरी एक्सप्रेस साप्ताहिक गाडीला नागपूरला तब्बल ५५ मिनिटांचा थांबा देण्यात आला आहे. यामुळे जोधपूरहून निघालेल्या प्रवाशांना पुढच्या प्रवासासाठी येथे विनाकारण अडकून पडावे लागत आहे. गोंदिया, नागपूर, वर्धा आणि बल्लारशाह जंक्शन येथे अनेक गाडय़ांना सुमारे अर्धा ते एक तासांचा थांबा देऊन मार्ग मोकळा होण्याची प्रतीक्षा करावी लागते. यामुळे प्रवाशांचा विनाकारण वेळेचा अपव्यय होत असतो. रेल्वे गाडय़ा तर सुरू केल्या जातात परंतु मार्ग उपलब्ध नसल्याने ठिकठिकाणी रेल्वे गाडय़ांना अधिक काळ थांबे देऊन तडजोड करावी लागत आहे.
भारतीय रेल्वेत कुर्मगतीने रेल्वे मार्गांची निर्मिती होते. यामुळे वाढती लोकसंख्या आणि त्या प्रमाणात रेल्वेगाडय़ा सुरू करण्याची होत असलेली मागणी यांची तोंडमिळवणी करणे रेल्वलो शक्य होत नाही. देशाचा आकार आणि रेल्वेचे जाळे बघता स्वतंत्र रेल्वे अर्थसंकल्प मांडण्याची परंपरा आहे. मात्र या रेल्वे मंत्रालयाचा वापर राजकीय नेत्यांनी आपापल्या राज्यातील राजकारणासाठी केल्याने रेल्वेच्या विकास समतोल बिघडला. रेल्वे भाडेवाढ करायची नाही आणि सरकारने रेल्वेला पुरेसा निधी उपलब्ध करायचा नाही. अशा दुहेरी चक्रात अडकलेली भारतीय रेल्वे आर्थिक गर्तेत गेली आणि नवे रेल्वे मार्ग टाकण्याची गती मंदावली. त्यामुळे प्रवाशांचा भार सहन करणे रेल्वेला दिवसेंदिवस जड जात आहे.
विद्यमान रेल्वे मंत्र्यांनी दरवर्षीच्या अर्थसंकल्पात रेल्वे गाडय़ांची घोषणा करण्याची परंपरा खंडित करून वास्तविकतेची जाणीव करून दिली. सोबत रेल्वे मार्गाचे जाळे अधिक घट्ट विणण्यासाठी आणि लोकांची गरज भागवण्यासाठी थेट परदेशी गुंतणुकीशिवाय पर्याय नसल्याचे त्यांना वाटू लागल्याचे अर्थसंकल्पातून दिसून आले. परंतु अद्याप त्या दिशेने भक्कम पाऊल पडलेले नाही. रेल्वेची ही पाश्र्वभूमी असताना आधी घोषित केलेल्या रेल्वे गाडय़ा चालविताना रेल्वे परिचालन व्यवस्थेवर प्रचंड ताण पडत असल्याचे दिसून आले आहे.
१८४७४ जोधपूर-पुरी एक्सप्रेस साप्ताहिक गाडी दुपारी २ वाजता नागपुरात येते आणि दुपारी २.५५ वाजता पुरीकडे रवाना होते. कधीकधी तर ही गाडी यापेक्षा अधिक काळ येथे थांबलेली असते, असे प्रवाशांचे म्हणणे आहे. यासंदर्भात रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे वेगळे आहे. नागपूर रेल्वे स्थानकावरून नियोजित वेळी गाडी सोडण्यात येते, असे त्याचे म्हणणे आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार नागपूर रेल्वे स्थानकावरून काही मिनिटे विलंबाने गाडी सोडण्यात आली तरी पुढील विभागात गाडी पोहोचेपर्यंत ही वेळ भरून काढली जाते. त्यामुळे त्या गाडीला विलंब झाला असे कागदोपत्री दिसून येत नाही.
यासंदर्भात बोलताना मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी प्रवीण पाटील म्हणाले, रेल्वे स्थानकावर अधिक काळ गाडी उभी ठेवणे हे रेल्वे हिताचे नाही. परंतु परिचलनाच्या दृष्टीने असे थांबे द्यावे लागतात तो रेल्वेच्या परिचलन नियोजनाचा भाग आहे.