लैंगिक परिषदेत डॉ. राजीव मोहता यांची माहिती
भारतात संयुक्त कुटुंब पद्धतीचे प्रमाण कमी होऊन विभक्त कुटुंब पद्धती वाढत आहे. या पद्धतीत पती-पत्नी दोघेही घराबाहेर राहत असल्याने मुले एकटीच असतात. एकांत दूर करण्यासाठी ते समाज माध्यमाच्या आहारी जातात. यातूनच आठवी ते दहावीच्या १५ वर्षे वयोगटातील ७० टक्के मुलांना पॉर्नोग्राफीचे आकर्षण वाढत असल्याचे पुढे आले आहे, अशी माहिती रविवारी लैंगिक परिषदेत डॉ. राजीव मोहता यांनी दिली.
राष्ट्रीय लैंगिक परिषदेत किशोरावस्थेतील मुलांचे भावविश्व आणि पालकांची जबाबदारी या विषयावर डॉ. मोहता बोलत होते. नागपुरात नुकतेच अश्लील व्हिडिओ पाहून एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याच्या घटनेवर प्रकाश टाकत डॉ. मोहता म्हणाले, किशोरावस्था शारीरिक बदलाचा काळ असतो. त्यामुळे मुलांच्या मनात स्वत:च्याच शरीरातील बदलणाऱ्या अवयवांविषयी वेगवेगळे प्रश्न निर्माण होतात. ही नैसर्गिक बाब असली तरी या प्रश्नांची योग्य उत्तरे पालकांकडूनच मुलांना मिळत नाही. यामुळे ही उत्तरे शोधण्याच्या प्रयत्नात चुकीच्या मार्गाचा वापर मुलांकडून होतो. लहान मुलांच्या हाती अलीकडे स्मार्टफोन दिसत आहेत. या फोनमुळे मुले अधिक जास्त स्मार्ट झाली आहेत.मोबाईल फोनच्या माध्यमातून सहज हवे ते मिळवण्यात ही मुले तरबेज झाली आहेत. त्यामुळे घरात मुलांच्या एकांतवासाला अशापद्धतीने मार्ग सापडतो.
अशावेळी पालकांची भूमिका महत्त्वाची असते. मुले ही पालकांची संपत्ती आहेत, परंतु महत्त्वाकांक्षेपोटी मुलांवर विशेष सक्ती केली जाते. अमूकच पद्धतीने वागायला हवे, अशी पालकांची हेकेखोर भूमिका दिसून येते. यातून मुले पालकांपासून दुरावतात. किशोरवयीन मुलांचे भावविश्व वेगळे असते. त्यांना समजून घेण्याची गरज आहे. भविष्यातील धोके टाळण्यासाठी मुलांशी संवाद साधावा. यावेळी डॉ. स्वाती धर्माधिकारी यांनी या विषयावर मत व्यक्त केले.

पोर्नोग्राफीमुळे मुलांत नैराश्य -डॉ. पळसोदकर
लैंगिक समस्या आणि मानसिक आजार या दोन्ही गोष्टींचा एकमेकांशी संबंध आहे. पोर्नोग्राफी साईट्सचा शरीरापेक्षा लहान मुलांच्या मनावर विपरीत परिणाम होतो. ही दृश्ये बघताना त्या पात्रांत मुले स्वत:ची प्रतिमा शोधण्याचा प्रयत्न करतात. यामुळे मुलांमध्ये नैराश्य, चिंतारोग होण्याची भीती आहे. पालकांनी मुलांशी संवाद साधावा. मुलांमध्ये खिलाडू वृत्ती तयार करावी, असे मत लैंगिक परिषदेत डॉ. राजीव पळसोदकर यांनी व्यक्त केले.