आज जागतिक व्याघ्रदिन

व्याघ्र प्रकल्पांची संख्या कमी होती तेव्हा वाघांची संख्या अधिक होती. आज व्याघ्र प्रकल्पांची संख्या अधिक आहे, तर जागतिक स्तरावर ९७ टक्के वाघांचे अस्तित्वच नाहीसे झाले असून उर्वरित तीन टक्केवाघ केवळ व्याघ्र प्रकल्पातच असून, त्याबाहेरील वाघांची संख्या संपल्यागत झाली आहे. इतकेच नव्हे, तर त्यांचा ९३ टक्के अधिवासही नष्ट झाला आहेत. जागतिक व्याघ्रदिनाच्या पाश्र्वभूमीवर समोर आलेली ही आकडेवारी अस्वस्थ करणारी आहे.

१९७३ साली पहिल्यांदा व्याघ्र प्रकल्प घोषित झाला तेव्हा देशात वाघांची संख्या १८२७ होती. व्याघ्र प्रकल्पांची संख्या ९ वर गेल्यावर त्यात २६८ वाघ होते, तर तब्बल आठपट वाघ हे व्याघ्र प्रकल्पांबाहेर होते. १९७९ मध्ये ११ व्याघ्र प्रकल्प झाले तेव्हा वाघांची संख्या ३०१५ होती. त्यातील ७११ वाघ व्याघ्र प्रकल्पात आणि बाहेर २३०४ वाघ होते.

१९८९ मध्ये व्याघ्र प्रकल्पांची संख्या १७ वर गेली आणि वाघांची संख्याही ४३३४ इतकी झाली. त्यापैकी १३२७ वाघ व्याघ्र प्रकल्पात आणि ३००७ वाघ व्याघ्र प्रकल्पाबाहेर होते.

अधिवास नष्ट होण्यामागील कारणे

जगभरातील वाघांपैकी अध्र्याहून अधिक वाघ भारतातच असल्याने जगभराच्या नजरा भारतावर आहेत. शिकार, मानव-वन्यजीव संघर्ष ही वाघांच्या नाहीसे होण्यामागील कारणे, तर शहरीकरण, शेती, उद्योग, वातावरणातील बदल ही वाघांचे अधिवास नष्ट होण्यामागील कारणे आहेत. जगभरात वाघांची संख्या : सायबेरियन सुमारे २००-३००, इंडो-चीन १०००, दक्षिण चीन ५०, सुमात्रा ५०० आणि भारतात २६०० इतकीच आहे.

जंगलात वाघांना तेव्हाही सुरक्षा नव्हती आणि आताही नाही, पण त्या वेळी वाघ सुरक्षित तरी होते आणि संख्याही मोठी होती. आता परिस्थिती याच्या विपरीत झाली आहे. विदर्भात हे चित्र वेगळे आहे. विदर्भात व्याघ्र प्रकल्पांच्या क्षमतेबाहेर वाघ आहेत. मात्र, मुद्दा पुन्हा एकदा वाघांच्या संरक्षणाचाच आहे. याबाबतीत कमकुवत बाजू वाघांची संख्या कमी होण्यास कारणीभूत ठरली आहे.

किशोर रिठे, सदस्य, राज्य वन्यजीव मंडळ

 

Untitled-10