‘ब्लॅकमेलिंग’ प्रकरण
‘मोक्का’ अंतर्गत कारागृहात न्यायालयीन कोठडी भोगणाऱ्या आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दिनेश बालचंद उर्फ पानाचंद नागदेवे (४५, रा. प्लॉट क्र. ६८३ तिडके टाऊन, इंदोरा) असे मृताचे नाव आहे. कारागृहात त्याला मारहाण करण्यात आली का? अशी चर्चा रंगली असून त्याच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.
तंत्रनिकेतन अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षांला प्रवेश करण्यासाठी एका मुलीला २० हजारांची आवश्यकता होती. त्यासाठी ती मुलगी एका ‘इव्हेंट मॅनेजमेंट’ कंपनीत काम करायची. दीपक अनिल आवळे (४५), दिनेश बालचंद उर्फ पानाचंद नागदेवे (४५), सुनीता किशोर बुलकर उर्फ सुनीता दीपक आवळे (३०) आणि पुष्पा उमाशंकर निखारे (४५) यांनी तिला हेरून एकरकमी २० हजार रुपये मिळवून देण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी त्यांनी मुलीला त्यांच्या सांगण्याप्रमाणे काम करायला सांगितले. पैशाची गरज असून ती पूर्ण होताना दिसल्याने मुलीने त्यांना होकार दिला. त्यानंतर आरोपींनी रेल्वेतील कर्मचारी सिद्धार्थ खोब्रागडे हा ग्राहक शोधला आणि १७ मार्च २०१६ ला गोधनी मार्गावरील राधाकृष्ण मंदिराजवळ भाडय़ाने राहणाऱ्या सुनीता हिच्याकडे दोघांनाही पाठविले. त्यांना एका खोलीत शारीरिक संबंध करण्याची मुभा देण्यात आली. त्या दरम्यान दीपक आणि दिनेश घरात शिरले. अचानकपणे घरात लोक शिरल्याने सिद्धार्थ घाबरला. आरोपींनी त्याच्यावर पीडित मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप केला. यातून वाचण्यासाठी त्याला पाच लाखांची मागणी केली. त्याच्याकडून एटीएम कार्ड हिसकावून त्याला त्याच्याच कारमध्ये बसवून शेगाव येथे घेऊन गेले. त्या ठिकाणी त्याच्या एटीएममधून ७० हजार रुपये काढले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याला घरी सोडून दिले आणि ३ लाख रुपयांचा धनादेश लिहून घेतला. हा धनादेशही आरोपींनी वटवला. त्यानंतर सिद्धार्थला सोडण्यात आले.
आरोपींच्या तावडीतून सुटल्यानंतर सिद्धार्थने थेट मानकापूर पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दिली. पोलिसांनी आरोपींविरुद्ध अपहरण, खंडणी आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी सूत्रधार दीपक, दिनेश, सुनीता आणि पुष्पा यांना अटक केली होती. त्यांच्याविरुद्ध मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली होती. दरम्यान, १३ जुलैला दिनेशची प्रकृती खालावली. त्यामुळे कारागृह प्रशासनाने त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) दाखल केले. तेव्हापासून त्याच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान शुक्रवारी दु.१२.५० वाजता त्याचा मृत्यू झाला.