• चार वर्षांत १,७०० वाहन परवाने निलंबनाचे प्रस्ताव
  • केवळ ३८४ वाहनांवरच कारवाई

बेशिस्त वाहन चालवणाऱ्यांच्या वाहनांचे परवाने निलंबित करण्याचे ब्रम्हास्त्र प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे आहे. परंतु त्याचा फारसा वापर विविध तांत्रिक अडचणींमुळे होतांना दिसत नाही. नागपूरच्या प्रादेशिक परिवहन विभागाकडे गेल्या चार वर्षांत १ हजार ७०० वाहन परवाने निलंबनाचे प्रस्ताव आले. चुकीच्या पत्ते व  इतर कारणांमुळे केवळ ३८४ परवानेच या कार्यालयाला निलंबित करता आली. यामुळे शहरातील वाहतुकीला शिस्त लागणार कशी? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

शहरात वारंवार वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनधारकांची संख्या वाढत असून दरवर्षी अपघातही वाढत असल्याचे वास्तव आहे. अपघातात अनेकांना अपंगत्व आले असून अनेक कुटुंबे घरचा कर्ता पुरुष निघून गेल्यामुळे उद्ध्वस्त झाले आहे. निष्काळजीपणे वाहन चालवून वारंवार रस्त्यांवर उपद्रव करणाऱ्यांचे वाहन चालवण्याचे परवाने निलंबित करण्याचे अधिकार केंद्रीय वाहतूक कायद्यान्वये प्रादेशिक परिवहन विभागाला आहे, परंतु नागपूरच्या प्रादेशिक परिवहन विभागाला गेल्या चार वर्षांत वाहतुकीच्या नियमांची वारंवार पायमल्ली करणाऱ्यांची संख्या हजारोंच्या घरात असताना केवळ १,७०० जणांचे परवाने निलंबनाचेच प्रस्ताव मिळाले. हे बहुतांश प्रस्ताव वाहतूक पोलिसांकडून मिळाले आहेत.

प्रस्तावाची अत्यल्प संख्या बघता वाहतूक पोलिसांना वाहनाचे नियम वारंवार तोडणारे एवढेच दिसले काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. केंद्रीय मोटार वाहन कायद्यानुसार परिवहन विभागाला वाहनाचे परवाने निलंबित करण्यापूर्वी संबंधित वाहनधारकाची एक सुनावणी प्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यालयांत घेण्यासह इतरही काही प्रक्रिया पार पाडाव्या लागतात. ही सुनावणी प्रादेशिक परिवहन वा उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याने घेण्याची गरज आहे. त्यानुसार वाहतूक पोलिसांकडून आलेल्या परवाना निलंबनाच्या प्रस्तावांपैकी ९५० जणांना कारणे दाखवा नोटीस प्रादेशिक परिवहन विभागाने गेल्या चार वर्षांत बजावली.

प्रक्रिया पूर्ण झालेल्या ३८४ जणांचे परवानेही निलंबित करण्यात आले, परंतु सुनावणी झालेल्यांपैकी अनेक दुचाकी, चारचाकीसह इतर संवर्गातील वाहन चालकाचा परवान्यावरील पत्ता चुकीचा असल्यासह विविध अडचणीमुळे  सुनावणी पुढे ढकलली. त्यामुळे १ हजार ३१६ जणांवर कारवाई झाली नसल्याचा धक्कादायक प्रकारही सुनावणी दरम्यान अधिकाऱ्यांच्या निदर्शनात आला. याप्रसंगी परिवहन विभागाला शहरातील अनेक वाहनधारकांनी पत्ते बदलल्यावरही त्याची नोंद प्रादेशिक परिवहन कार्यालयात केली जात नसल्याचे कळले. शहरात अपघातांची संख्या वाढत असतानाच परवाने निलंबनाचे प्रस्ताव अत्यल्प येत असल्याने या कारवाईने शहरातील वाहनधारकांना शिस्त लागणार कशी? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

शहरात अपघातामुळे ३१० मृत्यू

उपराजधानीत २०१६ मध्ये विविध अपघातात ३१० जणांचा मृत्यू झाला. गेल्या वर्षीपेक्षा ही संख्या जास्त असून ती प्रत्येक वर्षी वाढत असल्याचे नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी नागपूरच्या आरटीओ कार्यालयात झालेल्या रस्ते सुरक्षा सप्ताहाच्या उद्घाटन कार्यक्रमात सांगितले होते. अपघातात अनेकांना अपंगत्वही आल्याचे कटू सत्य आहे. हे मृत्यू व अपंगत्व नियंत्रणात आणण्याकरिता नागरिकांमध्ये कायद्याचा धाक निर्माण होणे गरजेचे असून त्याकरिता परवाना निलंबनाच्या कारवाईत वाढ होण्याची गरज विविध सामाजिक संघटना व्यक्त करत आहेत.

वाहनासह वाहन चालवण्याच्या परवान्यातील संबंधित वाहनधारकांचे पत्ते बदलले असल्यास ते सुधारून घेण्याचे महत्त्व नागरिकांना समजावण्याकरिता परिवहन विभाग जनजागृती अभियान राबवेल. प्रत्येकाने स्वत:सह इतरांच्या सुरक्षिततेसाठी वाहतुकीचे नियम पाळण्याची गरज आहे. शहरात गेल्या चार वर्षांत १७०० पैकी केवळ ३८४ वाहनांचे परवाने निलंबित झाले असले तरी पुढे या प्रकारच्या प्रस्तावावर तातडीने कारवाईचा प्रयत्न केला जाईल. त्यादृष्टीने शहर वाहतूक विभागासोबत काम सुरू आहे.

रवींद्र भुयार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर.