खासगी वाहतुकीच्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) दर्जेदार, वातानुकूलित, आरामदायी ‘शिवशाही’ बस फेऱ्या राज्यात चालवण्यात येणार असून त्याकरिता दिवाळीपर्यंत १०० तर डिसेंबपर्यंत १,२०० नवीन बसेस एसटीच्या ताफ्यात दाखल होतील, अशी माहिती राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी दिली. नागपूरच्या गणेशपेठ बसस्थानकावर ते पत्रकारांशी ते बोलत होते.

त्यांच्या उपस्थितीत नागपूर-भंडारा ‘शिवशाही’ बसचा शुभारंभ शिवसेनाचे जिल्हाप्रमुख सतीश हरडे यांच्या हस्ते झाला. यावेळी रावते यांनी बस, त्यातील सुविधांची पाहणी केली. विभागाचे क्षेत्रीय उपमहाव्यवस्थापक मुंडीवाले, विभाग नियंत्रक सुधीर पंचभाई, विभागीय वाहतूक नियंत्रक वडसकर उपस्थित होते.

रावते पुढे म्हणाले, एसटी तोटय़ात असून तिला अवैध वाहतुकीचा फटका बसत आहे. हा तोटा कमी करण्याकरिता ‘शिवशाही’ बससेवा सुरू करण्यात आली. या बसला मुंबई, ठाण्यात चांगला प्रतिसाद आहे.

मात्र ‘अश्वमेघ’चे तिकीट दर जास्त असल्यामुळे त्याला प्रतिसाद मिळू शकला नाही. मात्र, खासगी बसच्या स्पर्धेत टिकाव धरण्यासाठी दर्जेदार, वातानुकूलित, आरामदायी सेवा देण्याकरिता एसटीही सज्ज झाली आहे. नागपूरहून भंडाऱ्यासाठी सुरू झालेल्या या बसमुळे एक तासात भंडाऱ्याला १०४ रुपयांत पोहोचता येणार आहे. ही बस विनावाहक आणि विनाथांबा असेल. यात सीसीटीव्ही, वायफाय सेवा अंतर्भूत आहे. नागपूर-भंडारा दरम्यान प्रत्येक पंधरा मिनटांना २४ फेऱ्या चालवण्यात येणार आहे.

संघटनांचा संपाचा इशारा बेकायदेशीर

शासनच सातवा वेतन आयोग लागू करू शकत नाही. त्यामुळे तोटय़ातील महामंडळाला वेतन आयोग लागू करणे शक्य नाही. सध्या एसटीचे उत्पन्न ७ हजार कोटी तर खर्च १२ हजार कोटी रुपये आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि संपाचे प्रकरण न्यायालयात आहे. वेतन करार कामगार संघटनेसोबत सरकारला करायचा आहे. मात्र, संघटनांनी आठमुठे धोरण स्वीकारून कर्मचाऱ्यांना वेठीस धरू नये. बससेवा अत्यावश्यक सेवेत मोडते. त्यामुळे विविध संघटनांनी महामंडळाला संपाचा दिलेला इशारा बेकायदेशीर आहे, असेही दिवाकर रावते म्हणाले.