पर्यावरण ऱ्हासाची तीव्रता झपाटय़ाने वाढत असताना तो थांबवणे माणसाच्या हातात असूनही त्याला आवर घालणे कठीण होत आहे. त्याच पर्यावरण ऱ्हासाला थांबवण्यासाठी आता पंतप्रधानांनी आवाहन केले आहे. विशेष म्हणजे, हा ऱ्हास रोखण्यासाठी काम करणाऱ्या विदर्भातील एका संस्थेच्या कार्याचा उल्लेख त्यांनी केला असून, त्यांच्या या आवाहनाला किती प्रतिसाद मिळतो, हे येत्या आठ दिवसातच दिसून येणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ‘मन की बात’मध्ये पर्यावरणाला प्रदूषित करणाऱ्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती वापरू नका, तर मातीच्या मूर्ती वापरा, असे आवाहन केले आहे. यावेळी त्यांनी मी फक्त बोलतच नाही, तर काही संस्था यात चांगले काम करत आहेत, हे सांगताना अकोल्यातील ‘निसर्ग कट्टा’या संस्थेच्या कार्याचा उल्लेख केला. या संस्थेच्यावतीने गेल्या बारा वर्षांंपासून मातीच्या गणेशमूर्ती घडवण्याचे आणि नागरिकांच्या मनात पर्यावरणाविषयी जागरुकता निर्माण करण्याचे कार्य केले जाते. अकोल्यातील ‘निसर्ग कट्टा’च्या वेगवेगळ्या चमू जिल्ह्णाातील विविध शाळांमध्ये जाऊन मातीच्या मूर्ती वापरण्याचे आवाहन करत पर्यावरणाविषयाची त्यांच्या मनात जागरुकता निर्माण करतात. केवळ प्रबोधनच नाही, तर या विद्यार्थ्यांना कार्यशाळेच्या माध्यमातून मातीच्या मूर्ती घडविण्याचे प्रशिक्षण दिले जाते. अकोल्यात आता पाच-सहा जण स्वत:हून मातीच्या गणेशमूर्ती घडविण्यासाठी कार्यशाळा घेतात. ‘निसर्ग कट्टा’ने येथील मूर्तीकारांनाही मातीच्या गणेशमूर्ती घडविण्याचे आवाहन केले. या मूर्ती विकल्या जात नाही, हे कारण देऊन सुरुवातीला त्यांनी हरकत घेतली, पण आता स्वत:हून मातीच्या गणेशमूर्ती घडवतात. विशेष म्हणजे, आता तेथील नागरिकांचाही चांगला प्रतिसाद मिळत असून मातीच्या मूर्ती विकत घेऊन, तर काही स्वत: बनवलेल्या मातीच्या मूर्तीची स्थापना करून घरीच विसर्जन करतात. अकोल्यातील या ‘निसर्गकट्ट’च्या चळवळीसोबतच कोल्हापूरची निसर्गमित्र, पुण्यातील ज्ञान प्रबोधिनी, तसेच ‘एक कुटुंब आणि मुंबईचे एक गणेश मंडळ’ जे स्वत: १५ फूट मातीची गणेशमूर्ती तयार करून त्यांची स्थापना करतात. या संस्थांचीही दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात घेतली. मात्र, सुमारे दोन महिन्यापासूनच विक्रीसाठी गणेशमूर्तीचे आगमन झाले असल्याने पंतप्रधानांच्या या आवाहनाला कसा प्रतिसाद मिळतो, हे येत्या आठ दिवसातच कळेल.

भ्रमणध्वनी खणखणला अन् अभिनंदनांचा वर्षांव

श्रीकर परदेशी चार वर्षे अकोल्याचे जिल्हाधिकारी होते. त्यावेळी त्यांनी ‘निसर्ग कट्टा’च्या या उपक्रमाची दखल घेतली. पर्यावरणाविषयीची या कट्ट्याची कळकळ पाहून त्यांनीही जमेल ते सहकार्य करण्याचा प्रयत्न केला. पुण्यात गेल्यानंतरही कट्ट्याशी त्यांचे स्नेहबंध कायम होते. पंतप्रधान कार्यालयात त्यांची वर्णी लागल्यानंतर चार दिवसांपूर्वी त्यांचा अचानक फोन आला. कट्टाच्या कार्याचा एकूण अहवाल त्यांनी तयार करून मागितला. का, कशासाठी, हे प्रश्न त्यांना न विचारता अहवाल पाठवून दिला. रविवारी अचानक भ्रमणध्वनी खणखणू लागला आणि अभिनंदनाचा वर्षांव झाला. तेव्हा पंतप्रधानांच्या ‘मन की बात’ मध्ये पर्यावरण ऱ्हास थांबवण्यासाठी आपल्या कट्ट्याचे उदाहरण संपूर्ण भारतीयांना दिले गेले, हे पाहून या कार्याला आता आणखी बळ मिळाले आहे.

अमोल सावंत, निसर्ग कट्टा, अकोला