दिवाळीसाठी गावाकडे जाणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने रेल्वेने काही मार्गावर विशेष गाडय़ा सुरू केल्या असल्या तरी प्रवाशांचा कल नियमित गाडय़ांकडे असल्याचे दिसून येते. नियमित गाडय़ांमध्ये जागा नसल्याने प्रवासी खासगी बसेसकडे वळले असून खासगी बस संचालकांनी दुप्पटीहून अधिक भाडेवाढ करून उखळ पांढरे करणे सुरू केले आहे.

नागपूर आणि विदर्भातून पुणे, मुंबई, बंगळुरू शहरात शिक्षण, नोकरीसाठी गेलेल्यांची संख्या मोठी आहे. दिवाळी सणात ते गावाकडे येतात. त्यासाठी रेल्वेचे आरक्षण देखील अनेकांनी केले आहे, परंतु प्रयत्न करूनही आरक्षण न मिळालेला प्रवासी वर्ग मोठा आहे. हे रेल्वेच्या प्रतीक्षा यादीवर नजर टाकल्यास दिसून येते. त्यामुळे रेल्वे नागपूर-पुणे मार्गावर एक विशेष गाडी सुरू केली आहे, पण या गाडीला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. या गाडीला ४ नोव्हेंबरला ४५३, ११ नोव्हेंबरला ६५२, १८ नोव्हेंबरला ६५९ आणि २८ ऑक्टोबरला ६६१ बर्थ उपलब्ध आहेत. दुसरीकडे पुणे मार्गावर धावणाऱ्या सर्व गाडय़ांना लांब प्रतीक्षा यादी आहे. पुण्याहून २५ ते २९ ऑक्टोबरदरम्यान नागपूरकडे निघणाऱ्या रेल्वेगाडय़ांना पाय ठेवायलाही जागा नाही. महाराष्ट्र एक्सप्रेसला २६ ऑक्टोबरला ४९८ प्रतीक्षा यादी आहे, तर २६ नोव्हेंबरला तिकीट उपलब्ध नाही. पुणे-नागपूर सुपरफास्ट एक्सप्रेसला स्लिपर क्लासमध्ये २५ ऑक्टोबरला ६५८, २६ ऑक्टोबरला ६६३ आणि २७ ऑक्टोबरला ५०१ प्रतीक्षा आहे. गरीबरथला २६ आणि २९ ऑक्टोबरला स्लिपर क्लासमधील तिकीट विक्री बंद करण्यात आली आहे. ३१ ऑक्टोबरला ४०६ प्रतीक्षा आहे.

दिवाळी संपल्यानंतर परत जाणाऱ्यांमुळे गाडय़ांना १ ते ५ नोव्हेंबरदरम्यान गर्दी आहे. या काळात नागपूरहून पुण्याकडे जाणाऱ्या गाडय़ा हाऊस फुल्ल आहेत. नागपूरमार्गे पुण्याकडे जाणाऱ्या बिलासपूर एक्सप्रेसला ३ नोव्हेंबरला तिकीट उपलब्ध नाही. गरीबरथ, नागपूर-पुणे सुपरफास्ट एक्सप्रेस आणि महाराष्ट्र एक्सप्रेसला मोठी प्रतीक्षा यादी आहे. अशीच अवस्था मुंबई-नागपूर मार्गावरच्या रेल्वेगाडय़ांची आहे. नागपूरकडे येणाऱ्या सेवाग्राम एक्सप्रेसला स्लिपर क्लासमध्ये २५ ते २९ ऑक्टोबरदरम्यान पाचशेपेक्षा अधिक आणि एसी थ्री टीअरमध्ये प्रतीक्षा आहे. विदर्भ एक्सप्रेसला साडेपाचशेपर्यंत प्रतीक्षा आहे. २९ ऑक्टोबरला तर या गाडीचे स्लिपर क्लासमधील तिकीट विक्री बंद झाली आहे. दुरान्तो एक्सप्रेसमध्ये प्रचंड गर्दी आहे. या गाडीच्या स्लिपर क्लाससाठी २८ आणि २९ ऑक्टोबरला तिकीट विक्री बंद आहे. एसी थ्रीमध्ये साडेचारशेपर्यंत प्रतीक्षा पोहोचली आहे.

दिवाळी तीन दिवसांवर येऊन ठेपली आहे. प्रवाशांची होणारी गर्दी पाहता भरमसाठ भाडेवाढ केली आहे. लांबच्या अंतरासाठी प्रवाशांकडून आरामदायी बसेसला पसंती दिली जाते. या काळात खासगी बसेस देखील फुल्ल झालेल्या असतात. त्यामुळे त्यांच्याकडून भाडेवाढ केली जात आहे. दरम्यान, प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करून विशेष गाडय़ांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी प्रवीण पाटील यांनी केले.

खासगी बसचे भाडे दुप्पट

दिवाळीसाठी प्रवाशांची गर्दी वाढल्याने खासगी बस संचालकांकडून मनमानी पद्धतीने भाडे आकारले जात आहे. दिवाळीच्या चार-पाच दिवस आधी आणि दिवाळीनंतरच्या चार ते पाच दिवासात या भाडय़ात दुपटीने वाढ केली केली आहे. आजच्या स्थितीत पुण्याला जाण्यासाठी दीड हजार, अडीच हजार रुपये घेतले जात आहेत. पुण्याचे भाडे एरवी साडेचारशे ते सहाशे रुपये आकारले जाते.