नागालँडमध्ये प्रचंड मोठय़ा प्रमाणात शिकारीला बळी पडलेला ‘अमुर फाल्कन’ हा पक्षी नागपूरपासून अवघ्या काही किलोमीटरवरील उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात दिसून आला. विशेष म्हणजे, या पक्ष्याचे छायाचित्र घेण्यात बीएनएचएसचे प्रफुल्ल सावरकर यांना यश आले. दक्षिण आफ्रिकेकडून नागालँडमध्ये जात असताना तो विश्रांतीसाठी थांबला असावा, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. गेल्या वर्षी पेंच व्याघ्र प्रकल्पात ‘अमुर फाल्कन’ची नोंद आहे.

दरवर्षी तब्बल २२ ते २५ हजार किलोमीटर प्रवास करणाऱ्या शिकारी वर्गातील हा पक्षी आहे. नागालँडमधून भारतातून प्रवास करत हे पक्षी मोठय़ा संख्येने दक्षिण आफ्रिकेत येतात. पुन्हा एप्रिलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा निरोप घेऊन मंगोलियाकडे प्रस्थान करतात, पण परतीच्या मार्गावर ते नागालँडमध्ये येत नाहीत. हिवाळ्यात दक्षिण आफ्रिकेत जाणारा हा पक्षी दक्षिण आफ्रिकेच्या प्रवासावर निघण्यापूर्वी मोठय़ा संख्येने नागालँडमधील पंगाती गावात थांबतात. काही वर्षांपूर्वी या गावात एका मोसमात सुमारे एक ते दीड लाख अमुर फाल्कनची शिकार येथे केली जात होती. कोहिमा-दिमापूरसारख्या स्थानिक बाजारपेठेपासून, तर अगदी थायलंड, चीन आणि मलेशियापर्यंत त्यांचा हा व्यापार होत होता.

आंतरराष्ट्रीय पातळीवर हा विषय चर्चिला गेल्यानंतर स्थानिक प्रशासनावर प्रचंड दबाव आला. वनखातेही मग जागे झाले आणि स्वयंसेवींच्या मदतीने गावकऱ्यांचे मन वळवण्यात यश आले. विशेष म्हणजे, जे हात पूर्वी शिकारीला सरसावत होते तेच आता त्याच्या संवर्धनासाठी काम करीत आहेत. मंगोलियाकडून येणाऱ्या अमूर फाल्कनसाठी आता नागालँडमध्ये संवर्धनाचे प्रयत्न होत आहेत. एप्रिलच्या तिसऱ्या आठवडय़ात त्यांचा परतीचा प्रवास सुरू होतो.

गेल्या वर्षी पेंच व्याघ्र प्रकल्पात विश्रांतीसाठी थांबलेल्या अमुर फाल्कनने यावेळी उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याची निवड केली. २८ मार्चला बीएनएचएसचे प्रफुल्ल सावरकर निसर्ग शिबिरासाठी अभयाण्यात गेले असताना त्यांना सकाळी ६ ते ६.३० च्या दरम्यान तो एका झाडावर दिसला. जवळ गेल्यानंतर तो ‘अमूर फाल्कन’ असल्याचे सिद्ध झाले. त्यांनी या पक्ष्याचे छायाचित्र घेतले आणि अवघ्या काही सेकंदातच तो उडून गेला. फारसे स्पष्ट असे छायाचित्र घेता आले नाही, असे सावरकर म्हणाले. मात्र, गेल्या वर्षी पेंचमध्ये त्याचे स्पष्ट छायाचित्र घेण्यात यश आले.