X

अंगणवाडी सेविकांचे रास्ता रोको, जेलभरो

रास्ता रोको आंदोलनामुळे या भागातील वाहतूक बराच काळ विस्कळीत झाली होती.

पोलिसांची तारांबळ, वाहतूक खोळंबली

मानधनात वाढ, पूरक पोषण आहार दर्जात सुधारणा या व इतरही प्रमुख मागण्यांसाठी जिल्ह्य़ातील अंगणवाडी सेविका आणि कर्मचाऱ्यांनी गुरुवारी संविधान चौकात रास्ता रोको आंदोलन केले. सरकारने दिवाळीपूर्वी मागण्या मान्य केल्या नाही तर आंदोलन तीव्र करू, असा इशारा दिला. यावेळी रास्ता रोको आंदोलनामुळे या भागातील वाहतूक बराच काळ विस्कळीत झाली होती.

अंगणवाडी सेविकांच्या मागण्यासंदर्भात कुठलाच ठोस निर्णय घेतला जात नसल्यामुळे सेविकांनी गुरुवारी जेलभरो आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. आज सकाळपासून संविधान चौकात जिल्ह्य़ातील अंगणवाडी सेविका एकत्र जमा झाल्यानंतर सरकारच्या विरोधात धरणे आंदोलन करण्यात आली. श्याम काळे यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनाच्यावेळी सेविकांनी सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. पदाधिकाऱ्यांची भाषणे सुरू असताना काही सेविकांनी संविधान चौकात रास्ता रोको आंदोलन सुरू केल्यामुळे पोलिसांची तारांबळ उडाली. वीस ते पंचवीस मिनिटे रस्त्यावर ठिय्या आंदोलन केल्यामुळे या भागातील वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यानंतर जेलभरो आंदोलन सुरू झाले. सेविकांची संख्या बघता पोलिसांच्या गाडय़ा कमी पडल्या. सेविका आणि महिला पोलिसांची यावेळी वादावादी झाली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात येताच महापालिकेच्या सेवेतील २० बसेस बोलावण्यात आल्या आणि बसेसमध्ये बसवून महिलांना नेण्यात आले. जेलभरो आंदोलनामुळे पोलिसांची चांगलीच दमछाक झाली होती. दुपारी ३ वाजतापर्यंत ३ हजार ५०० महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. पोलीस लाईन टाकळी परिसरात नेण्यात आल्यानंतर त्या ठिकाणी रात्रीपर्यंत बसवून ठेवण्यात आले होते. जेलभरो आंदोलन झाल्यानंतर पोलिसांनी सेविकांना पुन्हा संविधान चौकात सोडण्याची तसदी घेतली नाही. त्यामुळे सेविकांनी यावेळी पोलीस प्रशासनाचा निषेध केला.

आंदोलन दडपण्याचा प्रयत्न

महिलांना गाडीत बसवताना धक्काबुक्की करण्यात आली. त्यात काही महिला जखमी झाल्या, असे संघटनेचे पदाधिकारी श्याम काळे यांनी सांगितले. पोलिसांचा आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होता. मात्र, अंगणवाडी सेविकांनी पोलिसांना न जुमानता जेलभरो आंदोलन केले. या आंदोलनानंतर सरकारला जाग आली नाही, तर येणाऱ्या दिवसात सेविका तीव्र आंदोलन करतील, असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी वनिता कापसे, रेखा कोहाड, अनिता गजभिये, उषा चरपे, चंद्रप्रभा राजपूत, शैला काकडे, शीला भोयर आदी संघटनेच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.

First Published on: October 6, 2017 2:46 am
Outbrain