एकाच वर्षांत २००, ३००, ४०० आणि ६०० किलोमीटरचा पल्ला सायकलने गाठत ‘सुपर रांदेन्युअर्स’चा खिताब पटकावणे तेवढे सोपे नाही. मात्र, पुरुषांची मक्तेदारी मानल्या जाणाऱ्या या कामगिरीवर एका महिलेने आपले नाव कोरले. २३ एप्रिलला ३०० किलोमीटरचा पल्ला गाठत आर्किटेक्ट ज्योती पटेल या मध्य भारतातील पहिल्या ‘सुपर रांदेन्युअर्स’ ठरल्या. त्यांनी ३०० किलोमीटरची ब्रेव्हेट १९ तास ३३ मिनिटात पूर्ण केली.

ही लांब पल्ल्याची ब्रेव्हेट पॅरिस आणि फ्रान्स येथील ऑडक्स क्लब पॅरिसनच्या एजीसच्यावतीने आयोजित करण्यात आली होती. शनिवारी दुपारी ४.३० वाजता झिरो माईल येथून ही नाईट ब्रेव्हेट सुरू झाली. २०० किलोमीटरच्या ब्रेव्हेटमध्ये १४ सायकलपटू सहभागी होते. झिरो माईलपासून तिगाव आणि तिगावपरुन परत झिरो माईल असे हे अंतर होते. तर ३०० किलोमीटरच्या ब्रेव्हेटमध्ये २६ सायकलपटू सहभागी होते. यातील सात सायकलपटूंना माघार घ्यावी लागली. झिरो माईल ते अमरावती मार्गावरील कोंढाळीतले कामत हॉटेल आणि परत झिरो माईल असे हे अंतर होते.

आर्किटेक्ट ज्योती पटेल या नाईट ब्रेव्हेटमध्ये सहभागी होणाऱ्या एकमेव महिला होत्या. ३०० किलोमीटरची नाईट ब्रेव्हेट ज्योती पटेल यांच्या बरोबरीने नागपूरचे सुदर्शन वर्मा आणि विजयवाडाचे जगदीश व डॉ. मनिसेकरन यांनी पूर्ण केली.

सुपर रांदेन्युअर्सचा एकूणच प्रवास ‘एक्सायटेड’ होता. पहिल्यांदा २०० किलोमीटरचे ब्रेव्हेट केले तेव्हा सुरुवातीला वाटले, आपण करु शकू अथवा नाही. मग मनात आले एकदा सुरुवात तर करू आणि सुरू केले तर क्षणाचाही थकवा जाणवला नाही. दरम्यान ६०० किलोमीटरची ब्रेव्हेट केली तेव्हाही काही त्रास झाला नाही. मात्र, ३०० किलोमीटरची ब्रेव्हेट करताना दुपारपासून सायंकाळचे उन्हं आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळचे उन्ह अंगावर झेलावे लागले. त्यातही उष्ण वाऱ्यांनी आणखी त्रास होत होता. त्यामुळे थोडा थकवा जाणवला. मात्र, वेळेच्या अर्धा तास आधी ते पूर्ण केले आणि घरच्यांनी केलेले सहकार्य, त्यांनी दिलेला पाठींबा सत्कारणी लागला.

– ज्योती पटेल, आर्किटेक्ट