माणसाच्या अंगी उपजत कला असली आणि त्या कलेला जिद्दीची जोड मिळाली तर कलारसिकांना बोलवायची गरज पडत नाही, तर ते आपोआप चालून येतात. त्या कलेला प्रसिद्धीची गरज पडत नाही, तर प्रसिद्धी आपोआप चालत येते. अशाच एका नागपूरकर कलावंताची कला रेल्वेने प्रवास करत थेट देशभरात जाऊन पोहोचली. जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्स मधून ‘मास्टर ऑफ फाईन आर्ट’ची पदवी मिळवल्यानंतर प्रियंका वानखेडे हिने अधिककाळ मुंबईत न रमता पुन्हा नागपूरची वाट धरली आणि तिची कला आता ‘अजनी रेल्वेस्थानका’च्या माध्यमातून देशभरात प्रवास करत आहे. गेल्या दीड महिन्यात अजनी रेल्वेस्थानकाचे तिने पालटलेले रूप देशभरातील प्रवाशांची वाहवा मिळवत आहे.

देशभरातील कोणतेही रेल्वेस्थानक पाहिले तर कुठे कचऱ्याचा ढिगारा तर कुठे पानांच्या पिचकाऱ्या! त्यामुळे बराच काळ रेल्वेस्थानकांवर थांबण्याची गरज पडली तर कुठे बसावे आणि वेळ कसा घालवावा हा प्रश्न पडतो. मात्र, हे कोडे प्रियंकाने सोडवले. नागपूर शहराची वाटचाल विकासाच्या वाटेने वेगाने होत आहे. तेरा व्याघ्रप्रकल्पांचे प्रवेशद्वार, मेट्रोची वाटचाल, मिहान आणि गोरेवाडासारखे मोठे प्रकल्प आता मार्गी लागले आहेत. नागपुरात येणाऱ्या प्रत्येकालाच याची माहिती नाही. विमानाने येणाऱ्या प्रवाशाला वर्धा मार्गावर थोडीफार नजर टाकली तर विकासकामांची थोडीफार कल्पना येते. रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशाला मात्र ही कल्पनासुद्धा येत नाही. त्यामुळे अजनी रेल्वेस्थानकावर येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांना याबाबत माहिती मिळावी म्हणून कलेच्या माध्यमातून हा प्रवास या रेल्वेस्थानकावर साकारण्याचे ठरले. इलेक्ट्रिक लोको शेडला प्रियंकाने केलेली कलाकृती रेल्वे अधिकाऱ्यांना ठाऊक होती आणि म्हणूनच मग अजनी रेल्वेचेही रूप पालटण्यासाठी त्यांनी प्रियंकाची निवड केली. रेल्वेस्थानकावरील जिने, खांब, भिंत असे सारे काही प्रियंकाच्या रंगात न्हाऊन निघाले. ते फक्त रंग नव्हते तर नागपुरात होणारा औद्योगिक, कलात्मक आणि एकूण सर्वागीण विकासाच्या दिशेने होणारी वाटचाल तिने चित्रित केली. अवघ्या दीड महिन्यात तिने एकटीने या संपूर्ण रेल्वेस्थानकाचे रूप पालटले.

नागपूरकर कलावंतांची झेप

जे.जे. स्कूल ऑफ आर्टमधून एमएफए केल्यानंतर काही काळ त्याचठिकाणी होते. नागपूरला परतल्यानंतर काय करायचे म्हणून आधी घरांच्या भिंतीवरच प्रयोग केला. घरी येणाऱ्या जाणाऱ्यांनी त्याचे कौतुक केले आणि त्यांच्या माध्यमातून ही कला बाहेर पोहोचली. इलेक्ट्रिक लोको शेड ‘म्युरल आर्ट’ मध्ये रंगवला. मुकुंद जोशी यांच्या माध्यमातून मग अजनी रेल्वेस्थानकावरून बोलावणे आले. अवघ्या दीड महिन्यात हे काम पूर्ण झाले. पानांच्या पिचकाऱ्या आणि कचऱ्यांच्या ढिगाऱ्याआड आपण केलेले कार्य लपले तर नाही ना, हे पाहण्यासाठी म्हणून काल-परवा सहज तेथे जाऊन आले तर अजनीचे पालटलेले रूप जसेच्या तसे पाहून समाधान वाटले. नागपूर हे देशाच्या हृदयस्थानी आहे आणि नागपुरातील घडामोड प्रवाशांची नजर टिपत असल्याचे पाहून आनंद झाला. व्यावसायिक दिशेने आणि मनापासून केलेल्या कामाचे नेहमीच चीज होते. विदेशात अनेक कलावंत याच पद्धतीने काम करतात. आपल्याकडेही तसे झाले तर  निश्चितच त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल.

प्रियंका वानखेडे