आसामच्या राज्यपालपदी नियुक्ती झाल्याबद्दल जाहीर सत्कार

राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात काम करताना बाबूजींनी जीवनात तत्वांशी कधीही तडजोड केली नाही. समाजजीवनात एक नवा आदर्श निर्माण केला.  विचारांशी बांधीलकी ठेवत आयुष्यभर पारदर्शी जीवन जगले. बनवारीलाल पुरोहीत यांचा सन्मान म्हणजे, पारदर्शी व्यक्तीमत्त्वाचा गौरव असून त्यांच्या या राजकीय, शैक्षणिक, सामाजिक जीवनाचा लाभ राज्यपाल म्हणून आसामला मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

माजी खासदार बनवारीलाल पुरोहीत यांची आसामच्या राज्यपालपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला. वसंतराव देशपांडे सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती विकास सिरपूरकर, खासदार डॉ.विकास महात्मे, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी खासदार दत्ता मेघे, खासदार अजय संचेती, महापौर प्रवीण दटके, सत्कार समितीचे निमंत्रक गिरीश गांधी आदी मान्यवर उपस्थित होते. नागपुरात राजकीय, सामाजिक क्षेत्रातील कुठलीही कामे गेल्या २५-३० वर्षांत बाबूजींशिवाय झालेली नाहीत. राजकारणात प्रवेश केला आणि महापालिकेच्या निवडणुकीत उभा राहिलो. त्यावेळी राजकारणात सकारात्मकता काय असते, हे त्यांच्याकडून शिकलो. राजकारणात प्रेरणास्थान म्हणून त्यांच्याकडे बघतो. राजकीय जीवनात पारदर्शीपणा असला पाहिजे, ही शिकवण त्यांनी दिली. कधीही तत्वांशी तडजोड केली नाही. काम होत नसेल, तर नाही म्हणून सांगतात.

सामान्यांच्या पाठिशी ते आयुष्भर उभे संघर्षमय जीवन जगले आहेत. राज्यपाल म्हणून ते मोठे असले तरी व्यक्ती म्हणूनही श्रेष्ठ आहेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले. नितीन गडकरी म्हणाले, पुरोहीत यांची राज्यपालपदी नियुक्ती म्हणजे, नागपूर, विदर्भाचा सन्मान आहे. भुवनेश्वरच्या भाजपाच्या बैठकीत स्वतंत्र विदर्भाचा ठराव मांडला होता. त्यात त्यांनी पुढाकार घेतला होता. आसामसारख्या राज्याचा विकास करण्याच्या दृष्टीने त्यांचा अनुभव तेथील लोकांना मिळणार आहे. आसामच्या विकासात त्यांचे योगदान राहील.

प्रकल्पग्रस्तांना नोकरीवर घेण्यात यावे, या मागणीसाठी केलेल्या आंदोलनाच्या वेळी सात दिवस बनवारीलाल पुरोहीत यांच्यासोबत कारागृहात राहावे लागले. संघर्ष काय असतो, हे त्याच्याकडून शिकायला मिळाले आहे.  एका ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्वाचा हा सन्मान असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. प्रास्ताविक अजय संचेती यांनी, तर संचालन संदीप जोशी यांनी केले. स्वागतपर भाषण महापौर प्रवीण दटके यांनी केले. महापालिकेच्या वतीने यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला. गिरीश गांधी यांनी आभार मानले. दयाशंकर तिवारी यांनी मानपत्राचे वाचन केले.

हा सत्कार अविस्मरणीय -बनवारीलाल पुरोहित

सत्काराला उत्तर देताना बनवारीलाल पुरोहित म्हणाले, आसामचे राज्यपाल म्हणून जो सन्मान मिळाला आहे तो माझा नाही, तर नागपूरकरांचा सन्मान आहे. नागपूरकरांनी केलेल्या प्रेमामुळे हा सन्मान मिळाला. आता आसाममध्ये तनमनधनाने काम करणार असून तेथे नागपूर नगरीचे नाव मोठे करणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून राज्यपालपद मिळणार असल्याचे ऐकत होतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जवळपास पाचदा भेट घेतली होती. राज्यपाल होऊ शकेल, असे वाटत नव्हते. त्यामुळे राज्यसभेत संधी मिळावी म्हणून पंतप्रधानांची एक दिवस भेट घेण्यासाठी गेलेलो असताना त्यांनी आपली राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्याचा प्रस्ताव असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यपालपदी नियुक्ती झाली असली तरी त्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा त्यात मोठा वाटा आहे. त्यांनी पंतप्रधानांना सांगितल्यामुळे ही नियुक्ती झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आजचा सत्कार हा कधीही विसरणार नाही. प्रत्येक राजकीय पक्षातील नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी केलेले प्रेम आयुष्यभर विसरू शकणार नाही, त्यामुळे हा सत्कार अविस्मरणीय असल्याचे ते म्हणाले.