अवैद्यकीय पर्यवेक्षक व सहाय्यकांची पदे रिक्त; शेवटच्या कुष्ठरुग्णांपर्यंत पोहोचणे अशक्य

केंद्र आणि राज्य शासनाकडून विविध योजनांच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांत कुष्ठरोग नियंत्रणाचा प्रयत्न सुरू आहे. परंतु शहरातील नागरिक कुष्ठरोग पथकातील अवैद्यकीय पर्यवेक्षकांची सर्व तर सहाय्यकांची १० पदे रिक्त असल्याची माहिती पुढे आली आहे. १६ अवैद्यकीय सहाय्यकांसह काही स्वयंसेवकांच्या मदतीने आरोग्य विभाग ३० जानेवारी ते १३ फेब्रुवारीदरम्यान सुरू असलेल्या कुष्ठरोग पंधरवडय़ात शेवटच्या कुष्ठरुग्णांपर्यंत पोहोचू शकत नसल्याचे आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात प्रत्येक वर्षी महात्मा गांधी यांच्या जयंती व पुण्यतिथीच्या निमित्ताने कुष्ठरोग निर्मूलन पंधरवडा कार्यक्रम राबवण्यात येतो. या काळात आरोग्य विभागाच्या वतीने शहरी व ग्रामीण भागातील प्रत्येक घरात पोहोचून कुष्ठरुग्ण शोधण्याचा प्रयत्न केला जातो. याकरिता कोटय़वधींचा खर्च दरवर्षी होतो. केंद्र व राज्य शासनाच्या वतीने शहरासह ग्रामीण भागात अनेक नागरिक कुष्ठरोग पथके नियुक्त केली गेली. नागपूर शहरातील  कुष्ठरुग्ण शोधण्याकरिता पर्यवेक्षक नागरिक कुष्ठरोगाचे तीन पथके नियुक्त आहेत. या तिन्ही पथकांच्या आखत्यारीत शहरातील २६ केंद्रे येतात. या सगळ्याच केंद्रात प्रत्येकी १ अवैद्यकीय सहाय्यकांचे पद मंजूर आहे.या सर्व अवैद्यकीय सहाय्यकांना त्यांच्या आखत्यारीत येणाऱ्या भागात नित्याने कुष्ठरुग्ण शोधण्याकरिता सर्वेक्षण करण्याचे काम करणे, कुष्ठरुग्णांना नित्याने औषध उपलब्ध करून त्यात खंड पडू नये याकरिता विशेष काळजी घेण्यासह इतर बरीच महत्त्वाची जबाबदारी पार पाडावी लागते. २६ अवैद्यकीय सहाय्यकांवर नियंत्रण करण्याकरिता तीन अवैद्यकीय पर्यवेक्षकांचे पद मंजूर आहे. परंतु ही पदे आणि अवैद्यकीय सहाय्यकांची दहा पदे शहरात रिक्त असल्याची माहिती आहे.  या विषयावर राज्याचे क्षयरोग व कुष्ठरोग विभागाचे आरोग्य सहसंचालक डॉ. संजीव कांबळे यांच्याशी संपर्कहोऊ शकला नाही.

निर्मूलन इतिहास

कुष्ठजंतूमुळे होणारा हा सांसर्गिक आजार आहे. १९४७ सालापर्यंत  या आजारावर प्रभावी औषध नव्हते. परंतु १९८० मध्ये एमडीटी (मल्टी ड्रग थेरपी) या अत्यंत प्रभावी, परिणामकारक व आधुनिक बहुविध औषधोपचारामुळे कुष्ठरोगाच्या स्थितीत महत्त्वपूर्ण बदल  झाले. या आजारावर नियंत्रणाकरिता भारतात १९८२- ८३ सालापासून सुरुवात झाली. त्याकरिता सर्वप्रथम भारतातील विदर्भातील वर्धा व पश्चिम बंगाल येथील पुरुलिया या दोन जिल्ह्य़ांत कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आला. त्यानंतर ही योजना संपूर्ण देशात सुरू करण्यात आली.

आकडेवारी वादात

सार्वजनिक आरोग्य विभागाकडील आकडेवारीनुसार नागपूर शहरात सन २०१४ साली प्रत्येक लाख नागरिकांमागे १२.७८ कुष्ठरुग्ण आढळून आले होते. ही संख्या सन २०१५ साली प्रत्येक लाखात १२.५९ कुष्ठरुग्णांवर आली. शहरात सगळ्या नागरिकांपर्यंत पोहचून शेवटचा कुष्ठरुग्ण या पथकांना कमी कर्मचाऱ्यांमुळे शोधणे शक्य नसतानाच ही संख्या घटली कशी? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यातच आरोग्य विभागातील कुष्ठरोग पथकांना नागपूर महापालिकेकडून मदत मिळत नसल्याची माहिती आहे. शासनाकडून महापालिकांना कुष्ठरोगाशी संबंधित विविध उपक्रम राबवण्याच्या सूचना नसल्याने हा प्रकार घडत असल्याचे बोलले जाते.