दोन पिस्तूल, २४ जिवंत काडतुसे जप्त

बिहारच्या देशीकट्टा तस्करासह तिघांना जेरबंद करण्यास नागपूर पोलिसांना यश आले. पोलिसांनी तिघांकडून दोन पिस्तूल, ४ मॅगझिन आणि २४ जिवंत काडतुसे जप्त केली.

अब्दुल मन्नान मोहम्मद रहमान (१९) रा. बिसनूर, असरगंज जि. मुंगेर (बिहार), हेमराज गोपीचंद शेंडे (२५) आणि दीपक दारूवाला ऊर्फ दीपक प्रेमलाल मन्सुरे (२४) दोन्ही रा. जगदीशनगर अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. अब्दुल हा बिहार राज्यात बी.एस्सी. प्रथम वर्षांला शिकतो. शिवाय तो अनेक वर्षांपासून रेल्वेद्वारे देशीकट्टे आणि देशी बनावटीच्या पिस्तुलाची नागपुरात तस्करी करीत असल्याची माहिती समोर आली आहे. तो अवैध दारूचा व्यवसाय करीत असून त्याच्याविरुद्ध यापूर्वीचे दोन गुन्हे दाखल आहेत. हेमराजचा काच विक्रीचा व्यवसाय आहे.

अब्दुल हा नागपुरात एकाला पिस्तूल विकण्यासाठी येत असल्याची माहिती गिट्टीखदान पोलिसांना मिळाल्यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक साजीद अहमद, हवालदार युवराज ढोले, संतोष उपाध्याय, शेखर आफताब, शेख इमरान आणि आशीष बावणकर यांनी सापळा रचून बुधवारी अब्दुल याला गिट्टीखदान चौकातील निर्मलगंगा शॉपिंग कॉम्प्लेक्स परिसरात ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून १ पिस्तूल, २ मॅगझिन आणि १४ जिवंत काडतुसे सापडली. पोलिसांनी सखोल चौकशी केली असता त्याने दीपक दारूवाला याला एक पिस्तूल विकल्याचे समजले. पोलिसांनी दीपक दारूवालाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने पिस्तूल हेमराजकडे असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी हेमराजकडून एक पिस्तूल, दोन मॅगझिन आणि १० काडतुसे जप्त केले, असे पोलीस उपायुक्त राकेश ओला यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी निरीक्षक वाघमारे उपस्थित होते.

शहरात अनेकांना पिस्तुलाची विक्री

अब्दुल मन्नान हा अनेक वर्षांपासून रेल्वेतून पिस्तूलची तस्करी करतो आणि नागपुरात विकतो. तो बिहारमध्ये १५ हजारांत शस्त्र घेतो व २० हजारांत विकतो, तर एका काडतुसासाठी ३५० रुपये आकारतो. आजवर त्याने शहरात अनेकांना शस्त्रे विकल्याची माहिती समोर येत असून पोलीस त्याचा तपास करीत आसल्याचे सांगण्यात येते.