उच्च न्यायालयाकडून गडचिरोली विधानसभा मतदारसंघाची निवडणूक रद्द

गडचिरोली विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढताना भाजप आमदार डॉ. देवराव होळी हे वैद्यकीय अधिकारी होते. त्यामुळे त्यांची निवड अपात्र असून गडचिरोली विधानसभा मतदारसंघाकरिता २०१४ ला घेण्यात आलेली निवडणूक रद्द ठरविण्यात येत असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी दिला.

अखिल भारतीय फॉरवर्ड ब्लॉकतर्फे निवडणूक लढणारे पराभूत उमेदवार नारायण जांभुळे यांनी ही याचिका दाखल केली होती. त्यांच्या याचिकेवर न्या. झका हक यांनी गुरुवारी हा निकाल दिला. विधानसभा निवडणुकीपूर्वी गडचिरोली जिल्हा परिषदेंतर्गत डॉ. देवराव होळी वैद्यकीय अधिकारी होते. वैद्यकीय अधिकारी असताना सिकलसेल आजाराच्या नियंत्रणासाठी त्यांनी शकुंतला मेमोरियल संस्था उघडली होती. २००८-०९ मध्ये जिल्हा परिषदेने एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण योजनेंतर्गत ३२ लाख ८२ हजार रुपये वितरित केले होते. त्या वेळी डॉ. होळी यांनी आपल्या संस्थेत ५० कर्मचारी असल्याचे खोटे दस्तऐवज सादर करून कर्मचाऱ्यांच्या मानधनापोटी ८ लाख ६८ हजार ३६३ रुपयांची उचल केली होती. त्यानंतर संस्थेचा गैरप्रकार चव्हाटय़ावर आला आणि तत्कालीन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी चामोर्शी पोलीस ठाण्यात डॉ. होळी आणि इतरांविरुद्ध शासकीय निधीचा अपहार केल्याची तक्रार दिली होती.

पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांच्यासह इतरांना अटक केली होती. यासंदर्भात गडचिरोली येथील मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांसमक्ष खटला सुरू आहे. दरम्यान, २०१४ मध्ये विधानसभा निवडणूक लढण्यासाठी त्यांनी वैद्यकीय अधिकारीपदाचा राजीनामा दिला होता, परंतु त्यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई सुरू असल्याने आरोग्य उपसंचालकांनी १४ ऑक्टोबर २०१४ रोजी त्यांचा राजीनामा फेटाळून लावला. त्या वेळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांच्या अर्जावर आक्षेप घेतले होते, मात्र नंतर त्यांचा उमेदवारी अर्ज ग्राह्य़ धरण्यात आला आणि ते निवडणूक लढले व जिंकले. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र प्रशासकीय लवादासमोर (मॅट) राजीनामा मंजूर करण्यासाठी अर्ज केला होता, परंतु मॅटनेही प्रकरणात गुन्हा दाखल असून त्यांची विभागीय चौकशी सुरू असल्याचे कारण देऊन राजीनामा स्वीकारण्यास नकार दिला व आरोग्य उपसंचालकांचा निर्णय कायम ठेवला होता. त्यानंतर जांभुळे यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन डॉ. होळी यांच्या आमदारकीला आव्हान दिले. या प्रकरणाची सुनावणी न्या. झका हक यांच्यासमक्ष झाली. न्यायालयाने सर्व साक्षीपुरावे तपासले आणि त्यानंतर हा निकाल दिला. जांभुळे यांच्यातर्फे अ‍ॅड. प्रदीप वाठोरे यांनी बाजू मांडली.

सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार

राजकीय पक्षाकडून निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना डॉ. होळी हे शासकीय नोकरीत कायम होते, हे पुराव्यांवरून दिसत आहे. त्यामुळे ते अपात्र ठरत असून गडचिरोली विधानसभा मतदारसंघाची २०१४ निवडणूक रद्द ठरविण्यात येत आहे. या मतदारसंघाची जागा आता रिक्त समजण्यात यावी, असे उच्च न्यायालयाने वाचून दाखविले, परंतु अद्याप आदेशाची प्रत मिळालेली नाही. आदेशाची प्रत मिळाल्यावर सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करण्यात येईल.  अ‍ॅड. गणेश खानझोडे, डॉ. देवराव होळी यांचे वकील.