राज्याच्या एका कोपऱ्यात असलेला आर्णी हा तसा दुर्लक्षित मतदारसंघ. माध्यमात चर्चेत न राहणारा. तसाही तो अनुसूचित जमातीसाठी राखीव असल्याने राजकारणाच्या केंद्रबिंदूपासून दूर असणारा. तर या अशा दुर्लक्षित क्षेत्राला पहिल्यांदा खरी ओळख दिली ती देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. त्यांनी या भागातील दाभाडीला शेतकऱ्यांसोबत चहा घेतला आणि हा मतदारसंघ चर्चेत आला. नंतरही हे चर्चेत राहणे सुरूच राहिले. त्याला कारण येथे मोदींनी दिलेली आश्वासने ठरली. आता दुसऱ्यांचा हा मतदारसंघ चर्चेत आणला तो त्याचे प्रतिनिधित्व करणारे भाजपचे आमदार राजू तोडसाम यांनी. यावरून चर्चेत राहण्याचा आलेख काय उंचावत आहे, असा खवचट प्रश्न कुणी उपस्थित करतीलही, पण त्याला इलाज नाही. आर्णीचा चहापाणी ते तोडपाणी असा झालेला प्रवास विरोधकांसाठी थक्क करणारा, तर भाजपसाठी अंतर्मुख करणारा आहे. कोण आहेत हे तोडसाम? आमदार होण्यापूर्वी ते केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांचे कार्यकर्ते होते. प्रतिकूल स्थितीत पक्षाची गादी सांभाळणाऱ्या उद्धव येरमेंचा पत्ता कापून आमदार झालेल्या या तोडसामांची ध्वनीफित सध्या गाजत आहे. त्यामुळे या तोडसामांना भाजपचा खरा चेहरा समजायचा का, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. या संभाषणात आमदार पैसे मागण्याचा उल्लेख करत नाहीत, उलट कंत्राटदार ते देण्याचा उल्लेख वारंवार करतो. त्यामुळे चौकशीतून काय ते बाहेर येईल. प्रश्न आहे तो आमदार वापरत असलेल्या भाषेचा. त्यांच्या बोलण्यात उद्दामपणा, दांडगाई, धमकी, मगरुरी अगदी ओतप्रोत भरलेली आहे. यालाच सत्तेची नशा असे राजकीय पाठय़पुस्तकात म्हणतात. यावरून तीन वर्षांपूर्वीचे ते दिवस किती छान होते हे अनेकांना आठवेल. तेव्हा भाजप सत्तेत नव्हता. त्यामुळे तो सुसंस्कृत, अभ्यासू, विचारी नेत्यांचा पक्ष होता. घसा कोरडा होईपर्यंत सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारायचे, सत्ताविरोधी वातावरण निर्मिती करायची व केव्हातरी विजय व सत्ता मिळेल या आशेवर जगायचे. खरच अगदी मंतरलेले दिवस होते ते. समाजातील अनेकांना भाजपच्या नेत्यांचे हे लढणे, संघर्ष करणे आवडायचे. या आवडीची जागा विश्वासाने घेतली व आली सत्ता एकदाची. आता सारे सुजलाम, सुफलाम होईल, प्रश्न मिटतील, सुसंस्कृत समाज निर्माण होईल या आशेवर सारे असताना तोडसाम त्याला दृष्ट लावायला निघाले आहेत. संभाषणातला कंत्राटदार अगदी अजिजीने सांगतो आहे, माझा मुलगा गेल्या सात महिन्यापासून कोमात आहे म्हणून. मात्र, या तोडसामांच्या भाषेतला जहरीपणा काही कमी होत नाही. भाजपचा सामाजिक पाया विस्तारत चालला आहे, याचे हे लक्षण मानायचे का, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तोडसाम पडले आदिवासी. त्यांच्याकडून सुसंस्कृतपणाची अपेक्षा कशाला, असाही प्रश्न कुणीतरी विचारेल. अगदी खरेच आहे ते. अजूनही मुख्य प्रवाहात नसलेला हा समाज जगण्यासाठी धडपडतो आहे. त्याला मुख्य धारेत आणण्यासाठी तोडसामांनी हा रुद्रावतार धारण केला असता तर ते एकदाचे समजून घेता आले असते, पण तसेही नाही. त्यांच्या संभाषणातील वाक्ये भलत्याच दिशेने जात आहेत हे सहज लक्षात येते. यात ते मुख्यमंत्र्यांचेही नाव घेतात. त्यांच्या या हिंमतीला दादच द्यायला हवी. कदाचित उद्या ते मोदी, शहांची नावे घेण्यास कचरणार नाहीत. फक्त तीन वर्षांत साचलेला हा सत्तेचा कैफ आहे. आणखी दोन वर्षे झाल्यावर आणि शहांच्या म्हणण्यानुसार समोरची तीस वर्षे पूर्ण होत असताना हा कैफ कसा वळण घेईल, यावर नुसता विचार केला तरी अंगावर काटा उभा राहतो. रामटेकचे आमदार मल्लिकार्जुन रेड्डींचेही तसेच. मूळचे कंत्राटदार असलेल्या या माणसावर गडकरींच्या हाताची भलीमोठी सावली पडली आणि व्यवसायासाठी शेजारच्या आंध्रमधून आलेले हे महाशय राजकारणात स्थिरावले. निवेदन घेऊन भेटायला आलेल्या महिलांचा अपमान केला म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. विरोधात असताना याच भाजपला महिलांविषयी अमाप आदर होता. काँग्रेसचे नेते कसे महिलांवर अत्याचार करणारे आहेत, याच्या कथा हा पक्ष रंगवून सांगायचा. यांच्या राज्यात महिला सुरक्षित नाही असे वाक्य प्रत्येक सभेत ठरलेले असायचे आणि आता? आता सर्व महिला सुरक्षित आहेत फक्त कधीकधी त्यांचा अपमान होतो इतकेच, असे या पक्षाचे नेते म्हणणार का? समोर येणाऱ्या लोकांशी कसे बोलायचे हेही एका आमदाराला समजत नसेल आणि तरीही त्यांचा पक्ष ‘इतरांपेक्षा वेगळा’ असे बिरुद लावून मिरवत असेल तर खरा भाजप कोणता, असा प्रश्न कुणालाही पडू शकतो व त्याचे उत्तर पुन्हा ज्याचे त्याने शोधायचे आहे. दयाशंकर तिवारी हे नागपुरातील नामी नाव. शेकडो वक्तृत्व स्पर्धाचा फड गाजवणाऱ्या तिवारींच्या जिभेवर सरस्वतीच वास करते, असा आजवर अनेकांचा समज होता. एका चित्रफितीने तो खोटा ठरवला. आता त्यांच्यावरही गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस अधिकाऱ्याला महिला शिपायांच्या समक्ष घाण भाषेत शिवीगाळ करतानाचे तिवारी बघितले की खरे तिवारी कोणते, असाच प्रश्न अनेकांना पडतो. समजा पोलीस चुकले असतील, नशेत असतील तर राग कुणालाही येऊ शकतो. त्यावर नियंत्रण ठेवण्याची कला जो शिकतो तो राजकारणात यशस्वी होतो. पक्षाच्या प्रबोधन वर्गात हेच तर नेहमी सांगितले जाते, पण तिवारी नेमके तेच विसरले. सत्तापक्षाचे माजी नेते, विद्यमान नगरसेवक, पक्षातील एक ठळक चेहरा अशी अनेक बिरुदे मिरवणारे तिवारी घसरलेले बघायला मिळणे हा सत्तेचा दोष की मानवी स्वभावाचा, याचेही उत्तर प्रत्येकाने शोधायचे आहे. विरोधक म्हणतात खूप वर्षांनी सत्ता मिळाली की असेच होते. वाढलेला उन्माद कमी व्हायचे नावच घेत नाही. हे जर खरे मानले तर दोष बिचाऱ्या मतदारांकडेच जातो. आलटून पालटून सत्ता देण्यात तो कमी पडला असेच म्हणावे लागते. नेत्यांच्या या बेताल वर्तनावर, भाषेवर भाजपचा एकही मोठा नेता बोलत नाही, प्रतिक्रिया देत नाही. यांना अटकाव केला तर पक्षाचा पाया विस्तारण्याची गती मंदावेल अशी भीती कदाचित त्यांना वाटत असावी, किंवा तेही त्यांच्या कैफात आकंठ बुडालेले असावेत. कारण काहीही असले तरी यामुळे भाजपचा खरा चेहरा कोणता, या प्रश्नाचा उलगडा हळूहळू व्हायला लागला आहे. सारेच आंबे चांगले नसतात हे खरे, पण सारेच आंबे सडकेही असायला नकोत, याची काळजी कुणी घ्यायची, यावर आता या पक्षात चर्चा होणार आहे म्हणे! आता चार दिवसांपूर्वीच या पक्षाचे अध्यक्ष अमित शहांनी लिहिलेल्या एका पुस्तकाचे प्रकाशन पुण्यात झाले. ‘भाजप राजकारणात कशासाठी?’ असे त्याचे प्रश्नार्थक शीर्षक आहे. ही उदाहरणे बघितली तर यासाठी हा पक्ष सत्तेत आला का, असा प्रश्न पुस्तक वाचण्याआधीच अनेकांना पडू शकतो. ही अंत्योदयाकडे जाणारी वाटचाल निश्चितच नाही हे मात्र खरे!

devendra.gawande@expressindia.com