निविदा न मागविता दालनांचे वाटप; विमलाश्रमलाही फटका

गांधीसागर तलावाच्या काठावर सुरू होणाऱ्या खाऊ गल्लीसाठी निविदा प्रक्रिया राबवून महिला बचत गट किंवा सामाजिक संस्थांना दालन निर्माण करून देण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, प्रत्यक्षात कुठलीही निविदा प्रक्रिया न राबवता पदाधिकाऱ्यांनी आपल्या हितसंबंधातील लोकांना ते उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या ठिकाणी विविध खाद्यपदार्थाचे २० ते २२ स्टॉल राहणार असून येत्या १३ ऑगस्टला खाऊ गल्लीचे लोकार्पण करण्याच्या दृष्टीने प्रशासनाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

शहरातील विविध भागात वर्दळीच्या ठिकाणी खाद्यपदार्थाचे ठेले किंवा स्टॉल लावले जातात. त्यांना एकाच ठिकाणी जागा देण्याच्या उद्देशाने चार वषार्ंपूर्वी ‘खाऊ गल्ली’ची संकल्पना समोर आली. तेथील दालने महिला बचत गटाला आणि सामाजिक संस्थांना उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन तत्कालीन स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश सिंगारे यांनी दिले होते. त्यानंतर दीड वर्षांत ही प्रक्रिया थंडावली. खाऊ गल्लीसाठी जागा शोधण्यासाठी वर्षभराचा काळ गेला. त्यानंतर शुक्रवार तलावाच्या काठावरील जागा निश्चित करण्यात आली.

गेल्यावर्षी १५ ऑगस्ट २०१६ ला काम सुरू करण्याची घोषणा करण्यात आली. मात्र, काम पूर्ण होऊ शकले नाही. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे वर्षभर हा कार्यक्रम लांबला. गेल्या वर्षभरात या ठिकाणी आकर्षक तंबू लावण्यात आले.

आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. प्रवेशद्वार उभारण्यात आले. परिसरात नारिंगी रंग देण्यात आला. प्रतीक्षा होती ती हा उपक्रम केव्हा सुरू होतो याची. या ठिकाणी २० ते २२ खाद्यपदार्थाचे दालन राहणार असून त्यासाठी निविदा प्रक्रिया न राबविता अर्ज मागविण्यात आले. अनेक सामाजिक संस्थांनी अर्ज केले आहे. त्यात विमलाश्रमसह १४ महिला बचत गटांचा समावेश आहे. मात्र, अर्जदारांना वगळून पदाधिकाऱ्यांनी आपल्या हितसंबंधातील लोकांना दालन उपलब्ध करून दिल्याची माहिती समोर आली आहे.

आरोग्य विभागाकडे दालन उपलब्ध करून देण्याची जबाबदारी असून त्यांच्याकडे स्टॉलधारकांची यादी मागितली, परंतु त्यांनी ती तयार नसल्याचे सांगितले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दालन वाटप करताना महिला बचत गट आणि सामाजिक संस्थांना डावलण्यात आले. राम इंगोले यांच्या विमलाश्रमच्या अर्जावर विचार करण्यात आलेला नाही. खाऊ  गल्लीचे उद्घाटन लवकरच होणार असल्यामुळे कोणाला ते देण्यात आले याची यादी जाहीर करावी, अशी मागणी दक्षिण नागपुरातील अस्मिता महिला बचत गटाने केली आहे.

दोन कोटी खर्चूनही गांधीसागर ‘जैसे थे’

ऐतिहासिक वारसा म्हणून गांधीसागर तलावासाठी २ कोटी खर्च होऊनही गांधीसागर तलाव व उद्यानांमधील समस्या ‘जैसे थे’ आहेत. यासंदर्भात गांधीसागर उद्यान कल्याणकारी संस्थेने महापालिका आयुक्तांची भेट घेऊन गांधीसागर उद्यानातील गैरसोयींचा पाढा वाचला. गांधीसागर तलाव आणि दोन्ही उद्यानांच्या सौंदर्यीकरणाच्या नावाखाली दोन कोटींचा निधी खर्च करण्यात आला. त्यात खाऊ गल्लीतील ३० स्टॉल्ससाठी ४२, ५०,५३६ रु., कोटा फिटिंगसाठी २,९५,४१७ रु., रंगरंगोटी २,९७,७८५ रु., शौचालय दुरुस्तीवर २,९९,९०६ रु., उद्यान शौचालयावर २७,३७,९३५ रु., उद्यान स्वच्छता ठेका २,४९,१७७ रु., चाफा वृक्ष लागवड १,४४,००० रु., कारंजी १७,३०,५५०रु., पागे उद्यानावर १५ लाख आदींचा त्यात समावेश आहे.