वाढदिवसाच्या निमित्ताने छायाचित्रांसह शुभेच्छा फलक लावले

आपल्या जन्मदिनानिमित्त कार्यकर्त्यांनी कुठेही शुभेच्छा फलके लावू नयेत, त्यावर होणारा खर्च जलयुक्त शिवार कार्यक्रमासाठी द्यावा, असे आवाहन खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वीच केले असतानाही त्यांच्या गृह जिल्ह्य़ातील भाजपच्या उत्साही कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाकडे पाठ फिरवून शहरातील बहुतांश ठिकाणी स्वत:ची छायाचित्रे असणारी शुभेच्छा फलके झळकावली.

What Amit Shah Said About Uddhav Thackeray?
“उद्धव ठाकरेंना त्यांच्या मुलाला मुख्यमंत्री करायचं आहे, म्हणून…”; अमित शाह यांचा गंभीर आरोप
Eknath Shinde viral video of karyakram karen
“मुख्यमंत्री साहेब, कार्यक्रम म्हणजे काय समजायचं?”, मुख्यमंत्र्यांचा ‘तो’ VIDEO शेअर करत काँग्रेसचा सवाल
asha workers protest at ajit pawar s bungalow
नागपूर: आशा स्वयंसेविकांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंगल्यापुढे ठिय्या आंदोलन, मागणी पूर्ण होईस्तोवर…
Firecrackers brought for Raj Thackeray burn for BJPs Kapil Patil
मनसेचे फटाके, भाजपाचे राज्यमंत्री कपिल पाटील यांच्यासाठी फोडले; कल्याणमध्ये कार्यकर्त्यांच्या अतिउत्साहाची फजिती

मुख्यमंत्री किंवा पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचा जन्मदिवस साजरा करणे हे सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी उत्साह साजरा करण्याचा दिवस असतो. त्याची तयारीही पक्षाच्या आणि कार्यकर्त्यांच्या पातळीवर फार पूर्वीपासूनच केली जाते. खुद्द मुख्यमंत्रीच नागपूरचे असल्याने कार्यकर्त्यांमध्ये हा उत्साह अधिक होता. भाजपच्या शहर शाखेनेही या दिवसाचे औचित्य साधून विविध कार्यक्रम आयोजित केले होते. मात्र, दोनच दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी जन्मदिवस साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेऊन या निमित्ताने फलकबाजी करू नये व त्यावरील खर्च जलयुक्त शिवार या कार्यक्रमासाठी द्यावा, असे आवाहन केले होते. मुख्यमंत्र्यांचा हा निर्णय कार्यकर्त्यांच्या उत्साहावर पाणी फेरणारा होता. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे फलकबाजीचे जाहीर प्रदर्शन ठिकठिकणाही झाले नसले तरी काही कार्यकर्ते त्यांच्या उत्साहाला आवर घालू शकले नाहीत.  त्यामुळे त्यांनी फलक लावलेच. बर्डीतील मुंजे चौकात मोठे फलक दिमाखाने दोन दिवसांआधीपासूनच नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.

पुढील वर्षी होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकांसाठी भाजपकडून उमेदवारी मिळावी म्हणून अनेक इच्छुक सध्या गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. त्यांच्यासाठीही हा दिवस महत्त्वाचा होता. यानिमित्ताने आपण मुख्यमंत्र्यांच्या किती निकट आहोत हे त्यांना लोकांना सांगायचे होते. अशा कार्यकर्त्यांनीही मुख्यमंत्र्यांच्या छायाचित्रासह स्वतचे छायाचित्र प्रकाशित करून प्रभागात आपली हौस भागवून घेतली. झाशी राणी चौक, गोकुळपेठ, महाल, झेंडा चौक, सदर, धरमपेठ, प्रतापनगर, वर्धमाननगर, रिंग रोड, वर्धा रोड या शिवाय अनेक वस्त्यांमध्ये असे फलक ठळकपणे लावले आहेत.

जून महिन्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा वाढदिवस पक्ष आणि कार्यकर्त्यांनी दणक्यात साजरा केला होता आणि त्यांनीही कुठलेही कार्यक्रम आणि फलका लावून अभिनंदनाचे कार्यक्रम करू नका, असे आवाहन केले होते.

मात्र, त्याकडेही कार्यकर्त्यांनी असेच दुर्लक्ष केले होते. गडकरींच्या जन्मदिनानिमित्त दक्षिण-पश्चिम मतदारसंघात आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते तर पूर्व नागपुरात शासकीय योजना संदर्भात शिबीर आयोजित केले होते आणि त्याला प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून शहरातील विविध प्रभागात दहावी आणि बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून काही त्यात काही नगरसेवकांनी कार्यक्रमस्थळी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करणारे फलक लावून त्यात स्वतचा उदोउदो करून घेतला असल्याचे दिसून आले.