रेल्वे डब्यांच्या देखभाल-दुरुस्ती केंद्राचा कायापालट

मध्य भारतात नॅरोगेजचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर होत असल्याच्या पाश्र्वभूमीवर रेल्वे डब्यांच्या देखभाल-दुरुस्तीच्या मोतीबाग केंद्राचाही कायापालट करण्यात येणार आहे. मोतीबागला दरदिवशी ३६ रेल्वे डब्यांची देखभाल-दुरुस्ती होऊ शकेल एवढय़ा क्षमतेचे ‘नॉन-एसी कोचिंग वर्कशॉप’ विकसित करण्यात येत आहे.

दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेची मोतीबागला कार्यशाळा आहे. सध्या येथे नॅरोगेज रेल्वे डब्यांची वार्षिक देखभाल दुरुस्ती केली जाते. तसेच ब्रॉडगेज रेल्वे डब्यांची देखील वार्षिक देखभाल दुरुस्ती केली जाते. या कार्यशाळेची वार्षिक क्षमता २७ डब्यांची आहे. याशिवाय येथे टॉवर व्हॅगन, फोर व्हील व्हॅगन आणि क्रेन दुरुस्तीची कामे सुरू आहेत.

रेल्वेच्या नागपूर विभागातील मध्यप्रदेश आणि नागपूर जोडणारे सर्व मार्ग ब्रॉडगेजमध्ये रूपांतरित केले जात आहेत. जबलपूर, नैनपूर, बालाघाट, छिंदवाडा, मंडला फोर्ट आणि नागपूर नॅरोगेज मार्गावरील सेवा बंद झाली आहे. मध्य प्रदेशातील नॅरोगेजचे जाळे संपुष्टात आले असून ब्रॉडगेजच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. त्या अनुषंगाने मोतीबाग कार्यशाळेला देखील विकसित करण्यात येत आहे. या कार्यशाळेच्या विस्ताराचे काम सुरू झाले असून २०१८ पर्यंत पूर्णक्षमतेने कार्यशाळा सुरू होईल. प्रस्तावित नॉन-एसी कोचिंग वर्कशॉपची क्षमता दरदिवशी ३६ रेल्वे डब्यांची आहे. मोतीबागला वर्कशॉप विस्तार आणि विकासाच्या कामाला गती आली आहे. यासाठी या भागातील ६२ झाडे कापण्यात येत आहेत.

वातानुकूलित डब्यांची देखभाल-दुरुस्ती चेन्नईला करण्यात येते. मोतीबागला विनावातानुकूलित डब्यांची विशिष्ट तासांच्या प्रवासानंतर आणि वार्षिक देखभाल-दुरुस्ती केली जाणार आहे. हा रेल्वे अर्थसंकल्पातील मंजूर प्रकल्प आहे. या कोचिंग वर्कशॉपमुळे मोतीबागचे महत्त्व कायम राहणार आहे. दक्षिण-पूर्व मध्य रेल्वेचे मोतीबागला डिझेल शेड व जैव शौचालय प्रकल्पदेखील आहे.

डिझेल शेडचे विभाजन

मोतीबाग ‘डिझेल शेड’च्या विभाजनाचा प्रस्ताव आहे. सध्या येथे डिझेल इंजिन आणि डेमू इंजिनची देखभाल-दुरुस्ती होते. गोंदियाला डेमूच्या देखभाल-दुरुस्तीची  स्वतंत्र व्यवस्था आहे. मोतीबागमधील डिझेल शेडचे दोन भाग करण्याचा प्रस्ताव आहे. डिझेल इंजिनच्या दुरुस्तीसाठी वेगळा विभाग राहील आणि डेमूसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे. डेमू इंजिनमध्ये डिझेल आणि इलेट्रिक अशा दोन्ही यंत्रणा असतात. डेमू इंजिनची देखभाल दुरुस्ती कॅरिज अँड व्हॅगन विभागाकडे जाणार आहे. डिझेल इंजिनची देखभाल-दुरुस्ती कर्षण विभागाकडे सोपवण्यात येणार आहे.

दोन वर्षांत कार्यशाळा

नॅरोगेज डब्यांच्या देखभाल दुरुस्तीचे काम अत्यल्प आहे. मोतीबागला ब्रॉडगेज नॉन-एसी डब्यांच्या देखभाल-दुरुस्तीचे केंद्र उभारण्यात येत आहे. हे केंद्र मार्च २०१८ पर्यंत पूर्णपणे कार्यरत होणे अपेक्षित आहे.

– पी.एस. खैरकर, मुख्य कार्य व्यवस्थापक, मोतीबाग कार्यशाळा