*  सर्वेक्षणाचा दुसरा टप्पा

* महापालिका निवडणूक

महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना आणि आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर भाजपमधील विद्यमान सदस्य आणि इच्छुक सक्रिय झाले आहेत. शहरातील ३८ प्रभागांतील उमेदवारांची चाचपणी सोबतच मतदारांचा अंदाज घेण्यासाठी शहरातील विविध प्रभागात सर्वेक्षणाचा दुसरा टप्पा लवकरच सुरू केला जाणार आहे. या दुसऱ्या टप्प्यात प्रभागातील इच्छुक उमेदवारांची नावे जनतेसमोर ठेवून त्याचा कितपत प्रभाव आहे, याची माहिती घेऊन अशा उमेदवाराला प्राधान्य देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

भाजपने मार्च महिन्यात शहरातील विविध भागात मतदारांचा कौल जाणून घेण्यासाठी मार्च महिन्यात सर्वेक्षण केले. प्रभाग रचना आणि आरक्षण जाहीर केल्यानंतर शहरातील विविध मंडळ अध्यक्षांकडून संबंधित प्रभागातील इच्छुकांची नावे मागविण्यात आली असून त्याची प्रभागानुसार यादी तयार केली जाणार आहे. महिलांसाठी आरक्षित असलेल्या प्रभागात अनेक विद्यमान सदस्यांची संधी हुकली असली तरी त्यांनी पर्याय म्हणून शेजारच्या प्रभागात निवडणूक लढवण्यासाठी तयारी सुरू केली. मात्र, त्या प्रभागातून त्यांना विरोध केला जात आहे. भाजपने स्थानिक पातळीवरील पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून  केलेल्या पहिल्या सर्वेक्षणात ५ टक्के मतदारांचा कौल जाणून घेतला होता. यावेळी प्रभाग रचना आणि आरक्षण जाहीर झाले नव्हते. मात्र, आता दिवाळी सुरू होण्याच्यापूर्वी सर्वेक्षणाचा दुसरा टप्पा सुरू केला जाणार असून त्यात संबंधित प्रभागातील इच्छुक उमेदवार, त्यांचा जनतेमध्ये असलेला प्रभाव आणि केलेली विकास कामे किंवा जनसंपर्क या गोष्टी बघितल्या जाणार आहेत. यासाठी विविध प्रभागातील वेगवेगळ्या वयोगटातील ५ टक्के जनतेशी ही सर्वेक्षण करणारी मंडळी संवाद साधणार आहे. त्यासाठी एका खासगी एजन्सीला काम देण्यात आले असून त्यात काही मुंबई आणि दिल्लीतील मंडळी आहे. सर्वेक्षण करणाऱ्या चमूमध्ये स्थानिक पातळीवर पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश राहणार नाही.

दरम्यान, भाजपने गेल्या काही दिवसात प्रभाग पातळीवर आणि त्यानंतर वार्ड पातळीवर कार्यकर्त्यांच्या बैठका आणि शिबिरे घेण्यात आली असून त्यात कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या आहेत. प्रत्येक प्रभागात उमेदवारांची चाचपणी करण्याची जबाबदारी ही मंडळ अध्यक्षांकडे देण्यात आली आहे. त्यांनी इच्छुकांची यादी तयार करून ती कोअर कमिटी सदस्यांकडे दिली आहे. सर्वात जास्त इच्छुक उमेदवारांची संख्या मध्य आणि दक्षिण मतदारसंघातील प्रभागातून असल्याचे समोर आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मतदारसंघ असलेल्या दक्षिण पश्चिममधून ३५० च्या जवळपास इच्छुकांची नावे समोर आली आहे. साधारणत: प्रत्येक प्रभागातून ४० ते ५० नावे समोर आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या इच्छुकांमध्ये आता कोणाला संधी मिळणार हे उमेदवारांची यादी जाहीर झाल्यावरच स्पष्ट होईल.